धनंजय वाखारे नाशिकशहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ६२ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, उन्हाळ्यात पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची जबाबदारी मागील वर्षाप्रमाणे पुन्हा एकदा नाशिककरांवर येऊन पडणार आहे. कारण, पंचांगकर्त्यांनी यंदाही मान्सूनचे आगमन विलंबाने होण्याचे भाकीत वर्तवताना सरासरी पाऊसमानाबाबत साशंकता व्यक्त केली आहे. पंचांगकर्त्यांच्या मते, यावर्षी आॅगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यात मघा नक्षत्रातील दमदार पाऊस वगळता अन्य नक्षत्रात मध्यम पावसाचे योग वर्तविले आहेत. मागील वर्षी नाशिककरांवर गहिरे जलसंकट कोसळले होते. पाणीकपातीचा सामना करणाऱ्या नाशिककरांना मागील पावसाळ्यात दिलासा मिळाला आणि गंगापूर धरणातील पाणीसाठा ९५ टक्क्यांवर जाऊन पोहोचला. त्यामुळे यंदा पाणीटंचाईची धग जाणवणार नाही. मात्र, आता गंगापूर धरणात ६२ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, येत्या ३१ जुलैपर्यंत नाशिक महापालिकेला त्याबाबत नियोजन करावे लागणार आहे. यंदा उष्णतामान वाढण्याचे संकेत दिले जात आहेत. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा जपून व काटकसरीने वापरण्याची जबाबदारी नाशिककरांवर येऊन पडली आहे. त्यातच, पंचांगकर्त्यांनी यंदा मान्सूनचे उशिराने आगमन होणार असल्याचे भाकीत वर्तविले आहे. दाते पंचांगकर्त्यांनी म्हटले आहे, यंदा उष्णतामानात वाढ होत राहणार असून, वळवाचे पाऊसही मेघगर्जनेसह होणार आहेत. त्यानंतर २९ मे ची मंगळ-शनि युती उष्णतामान वाढविणारी व आपत्तीदर्शक अशी आहे.
यंदा मान्सून बेभरवशाचा!
By admin | Updated: March 2, 2017 02:13 IST