दिंडोरी : तालुक्यातील नवे धागूर या गावात शासनाच्या निधीतून तसेच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सीबिलिटी अंतर्गत विविध कामे केली जाणार असल्याची माहिती ग्राम उत्कर्ष बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सूरज घोटकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे. या कामांमुळे अहमदनगर जिल्ह्यातील अतिदुर्गम लव्हाळी व नाशिक जिल्ह्यातील नवे धागूर या गावांची मॉडेल व्हिलेज म्हणून जागतिक ओळख होणार आहे. शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थापनातर्फे २०१८ हे वर्ष श्री साईबाबा समाधी जन्म्शताब्दी सोहळा वर्ष म्हणून साजरे होणार आहे. २०१८ या वर्षात मोठ्या संख्येने भाविक शिर्डीस भेट देणार आहेत. श्री साईबाबा समाधी जन्मशताब्दीनिमित्त साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थापनातर्फे ग्रामउत्कर्ष बहुद्देशीय सेवाभावी संस्थेस अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील लव्हाळी हे आदिवासी गाव विकासासाठी सूचित केले आहे . ग्राम उत्कर्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने संपूर्ण लव्हाळी गावाचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. संस्थेच्या या मॉडेलला शासनाची मान्यता मिळाली आहे. या नियोजित विकासकामांचे चलचित्र व स्लाईड शो च्या माध्यमातून विश्वस्तव्यवस्था समिती समोर सादरीकरण करण्यात आले . ग्राम उत्कर्ष संस्थेने केलेले सादरीकरण सर्वोत्कृष्ट ठरले असून मॉडेल व्हिलेज या संकल्पनेतून लव्हाळी या गावाचा विकास झाला तर सह्याद्रीच्या कुशीतील लव्हाळी आणि नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील नवे धागूर या आदिवासी गावांची जागतिक ओळख निर्माण करण्याचा मानस शिर्डी संस्थानचा आहे . मॉडेल व्हिलेज अंतर्गत गावाचा विकास झाल्यास गावातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळणार असून बेरोजगारीचा प्रश्न कायमचा सुटणार आहे . लवकरच या प्रस्तावित विकासकामांची अंमलबजावणी होणार आहे. नितिन सोनवणे, विश्वास खैरनार , अतुल भावसार , पंकज घोटकर , आदि तांत्रिक सल्लागारांच्या मार्गदर्शनाखाली श्री साईबाबा संस्थान व ग्राम उत्कर्ष सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा विकास कार्यक्र म राबविला जाणार आहे . (वार्ताहर)
नवे धागूर होणार ‘मॉडेल व्हिलेज’
By admin | Updated: April 1, 2017 01:41 IST