नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात सोमवारी दुपारी पुन्हा एक मोबाइल बेवारस स्थितीत मिळून आला. कारागृहात मोबाइल आला कसा हा प्रश्न नेहमीप्रमाणे अनुत्तरीय आहे. मात्र कारागृह प्रशासनाच्या कामकाजाबाबत दबक्या आवाजात उलटसुलट चर्चा आहे.दोन महिन्यांपूर्वी नागपूर कारागृहातून पाच सराईत गुन्हेगार प्रशासनाच्या हातावर तुरी देऊन पळून गेले ते अद्यापही सापडू शकले नाही. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नागपूर कारागृहात झडती मोहीम घेतली असता शेकडो मोबाइल, अमली पदार्थ, अवैध वस्तू मिळून आल्या होत्या. दरम्यान, याच काळात नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात वारंवार मोबाइल, गांजा सापडायच्या घटना उजेडात येत होत्या. या पार्श्वभूमीवर १५ दिवसांपूर्वीच कारागृह अप्पर पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर व दक्षता पथकाने सरप्राईज व्हिजीट (?) मारून नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शहर पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मदतीने झडती घेतली होती. या झडतीमध्ये काही एक न सापडल्याने कारागृह व प्रशासनाच्या कामकाजाला एकप्रकारे क्लिनचीटच देण्यात आली होती. पुन्हा मोबाइल सापडला तुरूंगरक्षक शेख रियाज शेख चॉँद सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शिलाई मशीन विभागात गस्त घालत असताना विद्युत डिपीजवळ प्लास्टिकच्या पिशवीत कागदात गुंडाळलेला एक हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा पांढरा मोबाइल मिळून आला. कारागृहात पुन्हा मोबाइल सापडल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात मोबाइल बेवारस स्थितीत
By admin | Updated: May 6, 2015 01:39 IST