नाशिक : महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत मनसेतून फुटून शिवसेनेला साथ देणाऱ्या दोघा फुटीर नगरसेवकांवर कारवाई करण्याची तयारी मनसेने केली असून, गुरुवारी (दि. २५) विभागीय आयुक्तांकडे यासंदर्भात अधिकृत तक्रार दाखल केली जाणार असल्याचे वृत्त आहे.महापौरपदाची निवडणूक १२ सप्टेंबर रोजी झाली. या निवडणुकीपूर्वी मनसेचे दोन नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागले होते. मनसेच्या कॅम्पमध्ये नसलेल्या नीलेश शेलार आणि शोभना शिंदे या दोन्ही नगरसेवकांनी नंतर मुंबई येथे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. यादरम्यान महापौरपदाची निवडणूक ज्यादिवशी होती, त्याच दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालिकेतील गटनेता अशोक सातभाई यांनी स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात दिली होती. तरीही शेलार आणि भागवत यांनी शिवसेनेचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांना महापौरपदाच्या निवडणुकीत, तर भाजपाचे संभाजी मोरूस्कर यांना उपमहापौरपदाच्या निवडणुकीत मतदान केले होते. त्यामुळे मनसे फुटीरांवर कारवाई करणार असल्याचे आमदार वसंत गिते यांनी जाहीर केले होते; परंतु त्यानंतर त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. मनसे आणि कॉँग्रेसनेही आपल्या दोघा फुटीरांना अभय दिल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर त्याची दखल घेऊन मनसेने तातडीने वकिलांकडे कागदपत्रांची पूर्तता केली आणि आता गुरुवारी (दि. २५) विभागीय आयुक्तांकडे रीतसर तक्रार करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
मनसे आज फुटीरांबाबत तक्रार करणार
By admin | Updated: September 25, 2014 00:08 IST