नाशिक : लोकसभा निवडणुकीतील धक्क्यातून मनसे सावरली जात नसताना पक्षाचे महापालिकेतील गटनेता अशोक सातभाई यांनी राजीनामा दिला आहे. अर्थात, वर्षभरासाठी असलेली मुदत संपल्याने हा राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.लोकसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार डॉ. प्रदीप पवार यांचा दारुण पराभव झाला. तथापि, या पराभवाची चुणूक लागल्यानेच की काय, परंतु निकाल लागण्याच्या अगोदरच राज ठाकरे यांनी नाशिक दौर्यावर येऊन नगरसेवकांचे मत जाणून घेतले होते. त्याच वेळी त्यांनी मनसेत आणि पालिकेतील सत्तेत खांदेपालटाचे संकेत दिले होते. त्यानंतर शहराध्यक्षपदी समीर शेटे यांच्याऐवजी राहुल ढिकले यांची निवड करण्यात आली. त्याचवेळी पालिकेतदेखील खांदेपालट होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानंतर आता गटनेता अशोक सातभाई यांनी मुदत संपल्याने नवीन गटनेता नियुक्त करावा, असे पक्षाचे प्रदेश सरचिटणीस वसंत गिते यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
मनसे गटनेता सातभाईंचा राजीनामा
By admin | Updated: May 21, 2014 00:39 IST