नाशिक : राज्याच्या हवामान खात्याने ४८ तासांत मान्सून सक्रिय होण्याचा इशारा दिल्यानंतर कालपासून शहर व जिल्ह्यात तुरळक स्वरूपात का होईना, पावसाने हजेरी लावल्याचे चित्र आहे. मात्र तरीही आणखी दमदार पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट खरीप हंगामात बळीराजासमोर आहे.दरम्यान, जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट ओढवल्यास आवश्यक त्या बियाणे व खतांच्या नियोजनाबाबत कृषी विभागाने तयारी सुरू केली असून, काल अखेर ३३ हजार ९६८९ क्विंटल बियाणे उपलब्ध असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यात भात-६७९० क्विंटल, बाजरी-४००८, सोयाबीन-६०६६, मका-१६८६८, कापूस-२३६ आदि बियाणे उपलब्ध आहेत.जिल्ह्णात खरिपाचे सरासरी पेरणी क्षेत्र ६ लाख ४० हजार ५०० हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी २ लाख २० हजार ९१० हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. भात पिकाचे सरासरी लागवडीखालील खरिपाचे पेरणी क्षेत्र ५१ हजार ७०० हेक्टर असून, त्यापैकी अवघ्या ७०४ हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड झाली आहे. मका पिकाचे खरिपाचे सरासरी क्षेत्र १ लाख २५ हजार १०० हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी १ लाख ३ हजार ४२९ हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच ९० टक्क्याहून अधिक सरासरी क्षेत्रावर लागवड झाली आहे. खरीप ज्वारीच्या १ हजार ९०० हेक्टर क्षेत्रापैकी २४६ हेक्टर क्षेत्रावर, तर बाजरीच्या २ लाख २ हजार ८०० हेक्टर क्षेत्रापैकी ६५ हजार २१८ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. नागली पिकाचे ३१ हजार २०० हेक्टर क्षेत्रापैकी १४३ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. भुईमुगाच्या ३० हजार ८०० हेक्टर क्षेत्रापैकी ७ हजार ६५७ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. (प्रतिनिधी)जिल्ह्णात कापसाचे ३९ हजार ६०० हेक्टर क्षेत्रापैकी २५ हजार ३१४ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. सोयाबीन पिकाच्या ४३ हजार ८०० हेक्टर क्षेत्रापैकी ५ हजार ७२३ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.
पावसाची अत्यल्प हजेरी : कृषी विभागाने केले बियाण्यांचे नियोजन
By admin | Updated: July 8, 2015 23:59 IST