नाशिक : एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ढगाळ हवामानामुळे तपमानात थोडी घट झाली होती, परंतु गेल्या काही दिवसांपासून तपमानात मोठी वाढ झाली असून, शुक्रवारी कमाल तपमान ३९.९ तर शनिवारी ३८.६ अंश सेल्सियस झाल्याने घामाच्या धारांनी नागरिक त्रस्त झाले होते. उन्हाच्या कडाक्यामुळे दुपारच्या वेळी शहरातील मुख्य रस्त्यावर शुकशुकाट जाणवत होता. दरम्यान, टरबूज, खरबुजाची मागणी वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. एप्रिलच्या मध्यात राज्यातील अनेक शहरांचा पारा चाळीशीकडे जात आहे. त्यात प्रामुख्याने मराठवाडा व विदर्भातील बीड, हिंगोली, जालना, अकोला, वाशीम आदि शहरांतील तपमान ४० ते ४३ अंशांवर गेले आहे. मालेगाव शहरात गुरुवारी राज्यातील सर्वोच्च म्हणजे ४२ अंश सेल्सियस तपमान होते. गेल्या महिन्यात २५ मार्च रोजी नाशिक जिल्ह्यात तपमान ४०.७ अंशांवर पोहचले होते. त्यानंतर मार्चच्या शेवटच्या आणि एप्रिलच्या पहिल्या सप्ताहात ढाळ हवामानामुळे तपमानात घट होऊन सरासरी ३० अंशांपर्यंत गेले होते, परंतु एप्रिलच्या मध्यात पुन्हा सूर्य तळपू लागला असून, तपमानात मोठी वाढ झाली आहे. उन्हाचा कडाका वाढल्याने सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत नागरिक अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडत नसल्याने रस्त्यावर काहीसा शुकशुकाट जाणवतो. उन्हापासून बचाव करण्यासाठी टोपी, रुमाल, गॉगल आदिंचा वापर वाढला असून, कलिंगड, काकडी आदि पाणफळांची मागणी वाढली आहे.
पारा चाळीशीकडेउन्हाचा तडाखा
By admin | Updated: April 17, 2016 00:02 IST