याबाबत आमदार बोरसे यांनी सांगितले, चौंधाणे येथील स्व.गोपाळराव तानाजी मोरे या एका सामान्य शेतकऱ्याने महाराष्ट्र सरकार व नंतर भारत सरकार दिल्ली येथे तत्कालीन पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांना समक्ष भेटून केळझर येथे धरण मंजूर करून घेतले. स्व. मोरे त्याकाळी कुठल्याही पक्षात वा पार्टीचे सदस्य नव्हते . धरण हाच माझा पक्ष असे म्हणून बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील ३५ ते ४० गावांतील लोकांना बरोबर घेऊन त्यांनी लढा दिला व केंद्र शासनाकडून राज्याला सूचना करून धरण मंजूर करून घेतले. " कुण्या एकाची धरणगाथा" पुस्तकातून त्यांनी केलेल्या धरण निर्मितीच्या संघर्षमय प्रवासदेखील लिहिण्यात आला आहे. त्यांच्या या संघर्षातून प्रेरणा मिळावी यासाठी धरण परिसरात स्व. मोरे यांच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून स्मारक तथा प्रेरणास्थळ उभारण्यात येणार आहे.
इन्फो
सरकारकडे पाठपुरावा करणार
कोरोनासारख्या महामारीच्या संकटाशी तोंड देताना या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली नाही. आगामी काळात स्व. मोरे यांच्या प्रेरणास्थळाच्या निर्मितीसाठी तालुक्यातील विविध क्षेत्रांतील व्यक्तींना सामावून घेणे आवश्यक आहे . त्यासाठी लवकरच स्मारक निर्माण समितीची स्थापना करण्यात येणार असल्याचेही आमदार बोरसे यांनी नमूद केले. दरम्यान, या स्मारकाला भव्य असे स्वरूप देण्यात येणार असून, त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री छगन भुजबळ, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून त्यांच्या सहकार्याने निधी मिळविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे बोरसे यांनी सांगितले.
कोट....
केळझर धरणाचे शिल्पकार आमचे वडील गोपाळराव मोरे यांच्या स्मरणार्थ आमदार दिलीप बोरसे यांनी स्मारक उभारण्याची घोषणा करून ११ लाख निधी जाहीर केल्याने आम्हा कुटुंबीयांना व केळझर कृती समितीला मनस्वी आनंद झाला आहे. हे स्मारक नक्कीच येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणा स्थळ ठरेल.
- धर्मराज गोपाळराव मोरे, चौंधाणे