नाशिक : सुमारे ८० कोटी रुपये खर्च करून उड्डाणासाठी सज्ज करण्यात आलेल्या ओझर विमानतळाच्या हस्तांतरण वादावर तोडगा काढण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांनी येत्या १० डिसेंबर रोजी नागपूर येथे बैठक बोलावली आहे. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम खात्याकडून मागितला जात असलेला मोबदला देण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यात काम पूर्ण होऊन उद्घाटन झालेल्या ओझर विमानतळाच्या हस्तांतरणाचा वाद आठ महिन्यांनंतरही कायम असून, सार्वजनिक बांधकाम खात्याने ८० कोटी रुपये त्यावर खर्च केल्याने सदरचे विमानतळ ओझरच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीकडे हस्तांतरण करण्यापूर्वी निधीची मागणी केली आहे. या दोन्हींच्या वादात विमानतळ सापडल्याने सध्या ते ठेकेदाराच्याच ताब्यात असून, त्याच्या देखभाल-दुरुस्तीचा खर्च करणे ठेकेदारालाही अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे या वादावर तोडगा काढण्यासाठी आता थेट मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांच्या उपस्थितीत १० डिसेंबरला नागपूर येथे बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीस एचएएलचे मुख्य अधिकारी, व्यवस्थापकीय संचालक, नाशिकचे जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्य सचिवांना पाचारण करण्यात आले आहे.
ओझर विमानतळासाठी आठवडाभरात बैठक
By admin | Updated: December 3, 2014 01:23 IST