लासलगाव :- कांद्याच्या भावात होत असलेली घसरण थांबविण्यासाठी केंद्र सरकारकडून निर्यातीत वाढ करणे तसेच ३० मिलियन डॉलर निर्यात होणारा शेतीमाल १०० मिलियन डॉलरपर्यंत करण्याचे उद्दिष्ट ठेवत कांद्याची मोठ्या प्रमाणात निर्यात करण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ९ व १० जानेवारी रोजी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह कांद्याशी निगडीत मंत्र्यांची बैठक घेऊन तोडगा काढण्यात येणार असल्याची माहिती राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. जळगाव येथून पुणे जिल्ह्यातील नारायणगाव या ठिकाणी जात असताना लासलगाव येथे मुक्कामी थांबलेल्या पाशा पटेल यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिले . यावेळी पटेल यांनी तीन राज्यात झालेल्या निवडणुकीत पराभव झाल्याचेही मान्य केले. राज्यासह इतर राज्यात वाढलेली कांद्याची आवक तसेच निफाड तालुक्यात साखर कारखाने बंद पडल्याने उसाच्या क्षेत्रात झालेली घट व कांद्याचे क्षेत्र वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात कांद्याची येणारी आवक, त्यामुळे कवडीमोल भावाने कांद्याची विक्र ी होत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर ओतून दिला. मिळालेल्या पैशांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मनीआॅर्डर करीत कांदा उत्पादकांच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला. राज्य व केंद्र सरकार खडबडून जागे होत जास्तीत जास्त कांद्याची निर्यात होण्यासाठी नितीन गडकरी यांच्या मध्यस्थीने रेल्वे मंत्र्यांची बैठक घेऊन कांदा वाहतुकीसाठी रेल्वेच्या रॅक (मालगाड्या) उपलब्ध करून दिल्या. निर्यातीला चालना देण्यासाठी असलेली पाच टक्के सबसिडी ही १० टक्के केली आहे .
कांदा भावावर तोडगा काढण्यासाठी दिल्लीत बैठक : पाशा पटेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 13:30 IST