भाजीबाजाराबाबतच्या सूचनेनेविक्रेते द्विधा मन:स्थितीतगंगाघाट भाजीबाजार : सानप यांनी दिली भेट, चर्चेनंतर निर्णयपंचवटी : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने मनपा प्रशासनाने गंगाघाटावर भरणाऱ्या भाजीबाजाराची जागा खाली केल्यानंतर गेल्या पाच महिन्यांपासून शेकडो भाजीविक्रेते अडचणीत सापडले आहेत. गुरुवारी पूर्व विधानसभा आमदार बाळासाहेब सानप यांनी गंगाघाटावर जाऊन शेकडो भाजीपाला विक्रेत्यांच्या भेटी घेत शुक्रवार (दि. २५) पासून पूर्वीच्याच जागेवर भाजीपाला विक्री करण्याच्या सूचना दिल्या आहेत; मात्र प्रशासन कारवाई करणार या धास्तीने विक्रेते द्विधा मन:स्थितीत सापडले आहेत.आमदार सानप यांनी भाजीविक्रेत्यांना केलेल्या बाजार भरविण्याच्या सूचनेनंतर विक्रेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे; मात्र भाजीबाजार सुरू केल्यानंतर मनपा प्रशासनाने कारवाई केल्यास काय करायचे असा सवाल विक्रेत्यांना पडला असल्याने आमदारांनी सूचना केली असली तरी भाजीबाजार सुरू करायचे धाडस करावे की नाही असा प्रश्न विक्रेत्यांसमोर आहे. सध्या भाजीविक्रेत्यांची बैठक सुरू असून, संघटनेच्या निर्णयानंतर भाजीबाजार पूर्वीच्याच जागी बसवायचचा की नाही यावर ठामपणे निर्णय घेणार असल्याचे भाजीविक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने गंगाघाटावरील शेकडो भाजीपाला विक्रेत्यांनी प्रशासनाला सहकार्य म्हणून भाजीबाजाराची जागा खाली करून दिली खरी, परंतु कुंभमेळा संपल्यानंतरही या शेकडो भाजीपाला विक्रेत्यांचा प्रशासनाने विचार न केल्यामुळे मागील पाच महिन्यांपासून बाजार बंदच असल्याने भाजी विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. आमदार सानप यांनी शेकडो व्यापाऱ्यांच्या पाठीशी उभे राहून सहकार्य करण्याची भूमिका घेतली असली तरी मनपा प्रशासन या भाजीबाजाराबाबत काय निर्णय घेणार हे मात्र निश्चित नाही. (वार्ताहर)
भाजीबाजाराबाबतच्या सूचनेने विक्रेते द्विधा मन:स्थितीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2015 22:04 IST