येवला : येथील पंचायत समिती कार्यालयात अधिकारी उशिरा येणे व लवकर निघून जाण्याचा प्रकार नियमित झाला असल्याने येथे येणाऱ्या ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतो. बुधवारी पंचायत समिती सदस्य मोहन शेलार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह स्टिंग आॅपरेशन केले असता कार्यालयातील जवळपास अनेक अधिकारी व कर्मचारी यांच्या खुर्च्या रिकाम्या असल्याचे आढळून आल्याने, गैरहजर असणाऱ्या कर्मचाऱ्यांची त्या दिवसाची बिनपगारी रजा करण्याची मागणी मोहन शेलार यांनी केली आहे.येवला पंचायत समितीमधील काही अधिकारी व कर्मचारी बाहेरगावाहून ये-जा करीत असल्याने त्यांना कार्यालयात पोहचण्यासाठी उशीर होतो. काही कर्मचारी मनमानी पद्धतीने दांडी मारतात. यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांना, लाभार्थींना ताटकळत बसावे लागते. यासंदर्भात पंचायत समिती सदस्यांकडे अनेकांनी तक्रारी केल्याने बुधवारी स्टिंग आॅपरेशन केले असता सर्व कार्यालयच खाली आढळून आले. पंचायत समिती कर्मचारीवर्गाची कार्यालयीन वेळ तशी सकाळी १० ते ५ असते. मात्र १२ वाजेपर्यंत काम करण्याचा मुहूर्त मिळत नाही. ग्रामीण भागातून येणारे लोक सकाळी १० पासून पंचायत समितीत कर्मचाऱ्यांची वाट पाहत असल्याचे विदारक चित्र येवला पंचायत समितीत पाहायला मिळते. सकाळी ११ वाजता सदस्य मोहन शेलार यांनी अचानक भेट देऊन हजेरी रजिस्टर व हालचाल रजिस्टर तपासले असता कर्मचारीवर्गाची चांगलीच धांदल उडाली. शिक्षण विभागात शिक्षण अधिकारी हजर होते. मात्र विस्तार अधिकारी यांनी हालचाल रजिस्टरमध्ये २७ तारखेला सायंकाळीच नोंद करून २९ तारखेला शाळा भेटीसाठी जाणार असल्याचे नमूद केले आहे. प्रत्यक्ष शाळेवर मात्र संबंधित विस्तार अधिकारी गेलेले नसल्याचे शेलार यांनी सांगितले. आरोग्य विभागात आरोग्य अधिकारीच कार्यालयात हजर नव्हते. चौकशी केली असता आरोग्य अधिकारी नाईकवाडी यांच्याकडे अंदरसूल आरोग्य केंद्राचा चार्ज असल्याने ते अंदरसूलला असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, अंदरसूल आरोग्य केंद्रात फोन करून चौकशी केली असता तेथे फोन उचलायलाच कोणी उपस्थित नसल्याचे लक्षात आले. तेथील कर्मचाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून विचारले असता आरोग्याधिकारी नाईकवाडी अंदरसूल आरोग्य केंद्रातही उपस्थित नसल्याची माहिती मिळाली. अशीच परिस्थिती पशुसंवर्धन विभागात आढळली. संपूर्ण पशुसंवर्धन कक्ष रिकामा होता. वित्त विभागातही केवळ एकच कर्मचारी हजर होता. (वार्ताहर)
येवल्यात अनेक अधिकारी गैरहजर
By admin | Updated: March 30, 2017 01:21 IST