नाशिक : सातपूर भागातील कार्बन नाक्याजवळ अनधिकृतपणे उभारलेल्या टपरीचे अतिक्रमण हटविण्यास गेलेल्या मनपा विभागीय अधिकाऱ्यास मारहाण केल्याची घटना मंगळवारी घडली. महापालिकेने संबंधितांविरुद्ध सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, महापालिकेने गंगापूर गावासह जेहान सर्कल, पंडित कॉलनी आणि होलाराम कॉलनीतील अनधिकृत बांधकामावर जेसीबी चालविला. महापालिकेने अनधिकृत बांधकामाविरुद्ध मोहीम आणखी व्यापक करण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने दुपारी गंगापूर गावठाणातील सरकारी जागेत झालेल्या टपऱ्यांचे अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. गंगापूर गावठाणातील अतिक्रमण विरोधी मोहीम आटोपून पथक सातपूर परिसरातील कार्बन नाका परिसरातून जात असताना तेथील टपऱ्यांचेही अतिक्रमण हटविण्यासंबंधी संबंधित व्यावसायिकांना सांगण्यात आले. परंतु, काही लोकांनी सातपूरचे विभागीय अधिकारी महेंद्रकुमार पगारे यांना घेराव घालून त्यांना धक्काबुक्की करत मारहाणीचा प्रयत्न केला. त्यात पगारे यांचा शर्ट फाटला. विभागीय अधिकाऱ्यास मारहाण आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी तत्काळ सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याचे आदेश दिले. त्यानुसार, सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. विभागीय अधिकाऱ्यास मारहाणीचा प्रकार घडल्याने महापालिकेतील अधिकारी वर्गाने या घटनेचा निषेध केला आहे. होलाराम कॉलनीतील साधू वासवानी रोडलगत सामासिक अंतरात श्रीमती शोभा जाधव, नंदलाल भोजवाणी, किसन अडवाणी, श्रीमती कलावती विरानी, कमलेश भाटीया, भगवानदास तेजवाणी यांच्या दुकानाचे, तसेच दिनेश शादीजा यांच्या कार्यालयाचे पक्के बांधकाम हटविण्यात आले.
गंगापूररोड परिसरात मोहीम
गंगापूररोडवरील जेहान सर्कल परिसरात चंद्रवीर अपार्टमेंट या इमारतीतील विष्णूकुमार पटेल यांनी शॉप क्रमांक १ च्या पुढे उभारलेले पक्के शेड, इमारतीच्या पार्किंगमधील जागेतील पक्के बांधकाम व सामासिक अंतरातील ओटा आदि स्वरूपाचे बांधकाम जेसीबीच्या साहाय्याने हटविण्यात आले. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. तर काही काळ वाहतूकही खोळंबली होती.