सोयगाव : मालेगांव शहरातील डी.के. स्टॉप महत्त्वाचा चौक असून, समस्यांच्या विळख्यात अडकला आहे. गुगल मॅपवर अस्तित्वात असलेला स्टॉप नागरिकांसाठी मोठी समस्या ठरत आहे. चौकात भूमिगत गटारीचे थातुरमातुर काम झाले असून, चेंबरचे काम बाकी, त्यात सर्वत्र मातीचे ढीग पडलेले असून, रहदारीस मोठी अडचण होत आहे. त्यात रस्त्यांची दैना झाली असून, जागोजागी खड्डे आहेत, वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे, खड्डा टाळावा की रस्ता, अशी अवस्था झाली आहे. त्यात चौकातील मुख्य भागात महापालिकेने मुरुम ओतून ठेवला असून, पाऊस पाण्यामुळे रस्ता कुठे, खड्डा कुठे, असे झाले आहे. चौकात मिनी बाजारपेठ तयार झाल्याने नागरिकांची वर्दळ वाढली आहेे. चौकात ट्राफिक जाम हा कायमचाच झाला आहे. कॉलेज रोडवर अवजड वाहन बंदी केल्याने त्या वाहनांचा वापरही या चौकातून झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तीन महिन्यांपूर्वी एका महिलेचा अवजड वाहनाखाली जाऊन मृत्यू झाल्याची घटना ताजीच असून, महापालिकेने अजूनही काही उपाय योजना केलेली नाही. हा स्टॉप एक समस्या अनेक अशी अवस्था असून, म.न.पा.ने वेळेत कार्यवाही न केल्यास संतप्त नागरिक घरपट्टी व पाणीपट्टी न भरून असहकार पुकारतील. शंभर टक्के घरपट्टी, पाणीपट्टी भरणारा प्रभाग असून, नागरी सुविधांपासून वंचित असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.
----------------------
प्रमुख समस्या
रस्ते खराब, जागोजागी खड्डे, ट्राफिक जाम समस्या, प्रदूषण
व्यापारी संकुल आल्याने पार्किंग समस्या, रस्त्यावर वाहन पार्किंग
मुख्य चौकात मुरुम पडून, वाहन चालकांना वाहन चालविणे अवघड
घाणीचे साम्राज्य, चौकात वाइन शॉप असून, दारुड्यांचा धुमाकूळ, जागोजागी रिकाम्या दारू बाटल्या पडलेल्या, प्लास्टीक ग्लास विखुरलेले,
लहान मुले अवजड वाहनाखाली येऊन अपघात होण्याची शक्यता
सार्वजनिक प्रसाधनगृहांचा अभाव (२६ सोयगाव)
260721\26nsk_29_26072021_13.jpg
२६ सोयगाव