चितेगाव येथे जनावरांतील संसर्गजन्य आजार चाचणीला प्रारंभपशुधन जोपासणे ही काळाची गरजओझर : जनावरांपासून मानवास होणारे संसर्गजन्य रोग निवारणार्थ जनावरांतील संसर्गजन्य गर्भपात व क्षयरोग निदान चाचणीचा राज्यस्तरीय शुभारंभ चितेगाव येथून झाला. पशुधन जोपासणे ही काळाची गरज असल्याचे मत यावेळी पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंभळे, पशुसंवर्धनचे सहायक आयुक्त डॉ. धनंजय परकाळे, पंचायत समिती सभापती सुभाष कराड, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. संजय विसावे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रशांत फालक, सरपंच सुभाष गाडे, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार आदि व्यासपीठावर उपस्थित होते.कार्यक्रमाला येण्यापूर्वी महादेव जानकर यांनी ज्ञानेश्वर गामने यांच्या मळ्यात दौरा करून त्यांच्याकडे असलेल्या ३०० म्हशी व २५ गायी यांच्या पशुधनाची पाहणी केली. त्यांची उत्तम निगा राखल्याबद्दल कौतुक केले. नारायण महाराज चौकात असलेल्या गायींना मान्यवरांच्या उपस्थितीत लस टोचून चाचणी घेऊन उपस्थित शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. शेतकऱ्यांना व पशुधन पालकांना याचा थेट लाभ घेता येणार आहे. जास्तीत जास्त पशूंची चाचणी करून घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. यातील लसीकरणाची औषधं ही उच्च दर्जाची आहे. याक्षेत्रात यापूर्वी असलेली पूर्वीच्या कंत्राटदारांची मक्तेदारी आम्ही मोडून काढली आहे. प्रत्येक टेंडर हे दर्जा आणि वस्तू पाहून निवडले आहे. दुग्ध व्यवसायात राज्य आज सातव्या नंबरवर गेल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावर तोडगा म्हणून त्यांनी शेतकऱ्यांना भेसळ न करण्याचे आवाहन केले. यामुळे मानवाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊन त्याचे रूपांतर थेट गंभीर आजारांमध्ये होते. आम्ही शुद्ध दूध कमी भावात देण्याची योजना आरेमार्फत सुरू केली असून, भविष्यात त्याचा चांगला फायदा होणार आहे. शेतकऱ्यांनी शेतीबरोबरच उद्योग व पशुधनसारखा जोडधंदा करण्याचे आवाहन जानकर यांनी केले. यासाठी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे यांनी यावेळी दिले. पशुपालकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन विजयश्री चुंभळे यांनी केले. डॉ. धनंजय परकाळे यांनी योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी यंत्रणा जोमाने काम करणार असल्याचे सांगितले. पंचायत समिती सभापती सुभाष कराड यांनी लोकांच्या अडीअडचणींबद्दल मत मांडले. सरपंच सुभाष गाडे यांनी स्वागत केले.पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. डी. के. चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्र म यशस्वीतेसाठी पी. एस. महाजन, मिलिंद भणगे, संजय महाजन, महेश ठाकूर, आर. आर. टर्ले व सर्व पशुसंवर्धन विभाग व चितेगाव येथील कार्यकारी सोसायटीतील पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)
महादेव जानकर : चितेगाव येथे जनावरांतील संसर्गजन्य आजार चाचणीला प्रारंभ
By admin | Updated: September 18, 2016 22:56 IST