मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व मंदिरे ऑक्टोबर महिन्यात भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येणार, असे स्पष्ट केल्याने भाविकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सर्व मंदिरे बंद असल्याने शेकडो भाविकांना देवदर्शनापासून वंचित राहावे लागत होते नित्य देवाचे दर्शन घडत नसल्याने भाविकांची मन:स्थिती बिघडली होती, तर मंदिर बंद असल्याने त्यावर उपजीविका करणाऱ्या अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर काही महिन्यांपूर्वी साधू-महंतांनी मंदिरे पुन्हा खुली करावीत यासाठी घंटानाद आंदोलन केले होते. मात्र शासनाने कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत नाही तोपर्यंत मंदिर उघडण्याचा निर्णय घेतला जाणार नाही, असे स्पष्ट केले होते. शुक्रवारी (दि. २४) शासनाने राज्यातील सर्व मंदिरे ऑक्टोबर महिन्यात खुली करणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर साधू-महंतांनी शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले.
शनिवारी सकाळी रामकुंडावर साधू-महंत तसेच स्थानिक भाविकांच्या उपस्थितीत गंगा-गोदावरीची महाआरती करण्यात येऊन कोरोना संकट लवकर दूर होवो, अशी प्रार्थना करीत शासनाने मंदिरे उघडण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करीत भाविकांना पेढे वाटप केले. यावेळी पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत भक्ती चरणदास, भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले, सतीश शुक्ल, अनिकेत शास्त्री, अलोक गायधनी, चंद्रशेखर पंचाक्षरी, अतुल गायधनी, शेखर शुक्ल, आदींसह भाविक उपस्थित होते.
(फोटो आहे.)