नाशिक : महापालिकेने तीन दिवसांतच अंबड-लिंकरोडवरील अनधिकृत भंगार बाजार भुईसपाट केल्यानंतर आता त्याठिकाणी पुन्हा अतिक्रमण होऊ नये याकरिता सिडको आणि सातपूर विभागीय कार्यालयातील दोन पथकांमार्फत नजर ठेवली जाणार आहे. दरम्यान, भंगार बाजाराचे मोठ्या प्रमाणावर मिशन राबविल्याने सर्वत्र चक्काचूर झालेले पत्रे, लोखंडाचा खच पडला आहे.महापालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये भंगार बाजार हटविण्याची कारवाई तीन दिवसांतच सुफळ संपूर्ण केली. महापालिकेने ज्या ठिकाणी डिमार्केशन केले होते, त्यांच्यावर हातोडा चालविण्यात आला. तीन दिवसांच्या अथक मेहनतीनंतर महापालिकेच्या पथकांनी विश्रांती घेतली. दरम्यान, उच्च न्यायालयाने भंगार मालाच्या व्यावसायिकांना त्यांचे साहित्य उचलून नेण्याची मुभा दिल्याने मंगळवारी काही व्यावसायिकांनी साहित्य घेऊन जाण्यासाठी महापालिकेकडे विचारणा सुरू केली आहे. भंगार बाजार उठविल्यानंतर पुन्हा त्याठिकाणी अतिक्रमण होऊ नये, याकरिता महापालिकेने आता दक्षता पथकांची नेमणूक करण्याचे नियोजन केले आहे. महापालिकेच्या सिडको व सातपूर विभागीय कार्यालयातील दोन पथकांमार्फत भंगार बाजार परिसरात गस्त घातली जाणार आहे. पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची पुरेपुर काळजी घेतली जाणार आहे. त्यासंबंधीच्या सूचना अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे व उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी विभागीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
मनपाचे पथक ठेवणार भंगार बाजारावर नजर
By admin | Updated: January 11, 2017 00:23 IST