सुरगाणा : तब्बल ७५ विद्यार्थ्यांसाठी केवळ एकच शिक्षक असलेल्या केंद्र शाळेत आणखी दोन शिक्षकांची नेमणूक करावी, अशी लेखी मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने संतप्त पालकांनी अखेर तालुक्यातील माणी येथील जिल्हा परिषद शाळेस कुलूप ठोकले.तालुक्यातील माणी येथे केंद्र असलेल्या जिल्हा परिषद शाळेचे पहिली ते पाचवीपर्यंत वर्ग असून, याठिकाणी तब्बल ७५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे पटसंख्येनुसार याठिकाणी तीन शिक्षकांची गरज असताना केवळ एकच शिक्षक गेल्या काही महिन्यांपासून कार्यरत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, अनेकवेळा मागणी करून व शालेय शिक्षण समितीने लेखी निवेदन देऊनही येथे शिक्षकांची नेमणूक करण्यात आली नाही. या गंभीर प्रश्नाकडे संबंधितांनी दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या पालकांनी व शालेय शिक्षण समितीने घेतलेल्या सभेत एकमताने ठराव संमत करून केंद्र असलेल्या माणी जि.प. शाळेस कुलूप ठोकले. येत्या दोन दिवसात येथे दोन शिक्षकांची नेमणूक न केल्यास येथील शिक्षण कार्यालयासमोर पालक उपोषणास बसतील, असा इशारा शालेय शिक्षण समिती व पालकांनी गटशिक्षण अधिकारी मेरगेवार यांना दिलेल्या लेखी निवेदनात दिला आहे. याबाबतची प्रत पं.स. सभापती, जि.प.सदस्य यांना देण्यात आली आहे. या निवेदनावर शालेय शिक्षण समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व पालकांच्या सह्या आहेत.(वार्ताहर)
माणी शाळेस ठोकले कुलूप
By admin | Updated: July 8, 2016 23:05 IST