नाशिक : परिवहन महामंडळात रिक्त असलेल्या चालक पदाच्या भरतीसाठी रविवारी नाशिकमध्ये तीन ठिकाणी परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षा एका खासगी संस्थेमार्फत घेण्यात आल्याने त्याबाबत स्थानिक प्रशासन पूर्णपणे अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. राज्यभरातील विविध केंद्रांवर चालक पदासाठी या परीक्षा घेण्यात आल्या. १०० गुणांच्या या परीक्षेसाठी दीड तासांचा अवधी देण्यात आला होता. त्यासाठी मराठी, इंग्रजी, गणित आणि इतिहास या विषयावरचे पश्न विचारण्यात आले. नाशिकमध्ये बिटको महाविद्यालय आणि कृषिनगर जॉगिंग ट्रकजवळील शाळेसह इतर एका ठिकाणी ही परीक्षा घेण्यात आली. प्रत्येक केंद्रात सुमारे ७५० विद्यार्थी उपस्थित होते. महामंडळात यापूर्वी राबविण्यात आलेल्या भरतीप्रक्रिया एमकेसीएलमार्फत राबविण्यात आल्या होत्या. तसाच प्रकार यंदाच्या परीक्षेत झाला असून, या परीक्षा पुण्यातील चाणक्य या संस्थेच्या मार्फत घेण्यात आल्या. त्यामुळे परिवहन महामंडळाची परीक्षा असतानाही स्थानिक पदाधिकाऱ्यांना येथे कोणत्याही प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले नव्हते. याबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती देण्यास स्थानिक अधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शविली. चालकांसाठी घेण्यात आलेल्या या लेखी परीक्षेनंतर पुणे येथे प्रात्यक्षिक चाचणी घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
स्थानिक प्रशासन पूर्णपणे अनभिज्ञ
By admin | Updated: May 4, 2015 00:55 IST