नाशिक : कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याने कोरोनामुक्त गावातील आठवी ते बारावीची शाळा सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली असल्याने नाशिक जिल्ह्यात याबाबत शनिवारी (दि.१७) अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत होणाऱ्या आढावा बैठकीत याबाबतची चर्चा केली जाणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे सायंकाळी ४ वाजता पालकमंत्री कोरोना आढावा बैठक होणार असून, कोरोनास्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आल्यामुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या तयारीबाबत पालकमंत्री माहिती घेणार आहेत. जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या निर्बंधांतून नाशिककरांना कोणतीही सूट मिळण्याची शक्यता नसली तरी शाळा सुरू करण्याबाबतचा सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे.
काेरोनामुक्त गावांमध्ये इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने परवानगी दिलेली आहे.
मात्र, अंतिम निर्णय जिल्हा प्रशासनच घेणार असल्याने नाशिकमध्ये अद्यापही अधिकृतपणे शाळा सुरू झालेल्या नाहीत. याबाबतचा निर्णय शनिवारच्या बैठकीत होणार आहे. शासनाचे निर्णयानंतर जिल्ह्यात माध्यमिकच्या २०० पेक्षा अधिक शाळा सुरू झाल्याचे बाेलले जात आहे.
शहर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होत असल्याने निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात यावी, अशी मागणी व्यापारीवर्गाकडून सातत्याने केली जात आहे; परंतु बाजारात होणारी गर्दी, तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निर्बंधांतून तूर्तास सुटका होण्याची शक्यता कमीच आहे. पुढील काही दिवसांत असलेल्या सण, सोहळ्यांच्या निमित्ताने गर्दीत वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे निर्बंधांत शिथिलता देणे धोक्याचे ठरू शकते. शिवाय एकदा शिथिलता दिल्यानंतर पुन्हा निर्बंध लावणे कठीण होणार असल्याने सध्या सुरू असलेले निर्बंध कायम राहाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शाळा सुरू करण्यास अधिकृत परवानगी दिली जाण्याची शक्यता असली तरी शालेय वाहतुकीला परवानगी मिळण्याची शक्यता कमीच आहे. शाळांना सुरक्षिततेची सर्व दक्षता घेऊनच शाळा सुरू करावी लागणार असल्याने शाळांनाही तशी तयारी करावी लागणार आहे.