लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील कोनांबे शिवारात विहिरीत पडलेल्या बिबट्याला दोन दिवस विहिरीतच मुक्काम करण्याची वेळ आली. विहिरीत शिडी टाकून बिबट्याला बाहेर काढण्यासह अनेक प्रयत्न केल्यानंतरही बिबट्याला बाहेर काढता येत नसल्याने शेवटी क्रेनच्या साहाय्याने विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले.
दोन दिवसांच्या प्रयत्नांनंतर मादी बिबट्याला वाचविण्यात आले. सिन्नर व नाशिक वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने सदर कामगिरी केली. शनिवारी (दि.१४) रात्री तीन वर्षाची मादी भक्ष्याच्या शोधात कोनांबे शिवारातील काशीनाथ डावरे यांच्या विहिरीत पडली. विहीर ७५ फूट खोल असून, त्यामध्ये पाच फूट पाणी होते. बिबट्या मादी विहिरीत पडल्यानंतर पाण्यात पोहून थकली. त्यानंतर जवळच असलेल्या कपारीचा आधार घेऊन शनिवारी रात्री विहिरीतच मुक्काम केला.
रविवारी (दि.१५) सकाळी १० वाजेच्या सुमारास डावरे शेतात काम करीत असताना त्यांना विहिरीतून डरकाळ्यांचा आवाज आला. डावरे यांनी विहिरीत डोकावू पाहिले असता त्यांना कपारीत बिबट्या बसलेला दिसला. डावरे यांनी तातडीने वनविभागाशी संपर्क साधला.
सिन्नरच्या नवनियुक्त वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव यांच्यासह वनपरिमंडळ अधिकारी प्रीतेश सरोदे, विवेक भदाणे, रावसाहेब सदगीर यांनी कोनांबे शिवारात घटनास्थळी धाव घेतली. नेहमीप्रमाणे बिबट्याला बाहेर काढण्यासाठी दोरीच्या साहाय्याने लाकडी बाज विहिरीत सोडण्यात आली. कपारीवर बसलेला बिबट्या लाकडी बाजेवर बसला. मात्र बाज दोरीने वर ओढल्यानंतर बिबट्याने पुन्हा पाण्यात उडी घेतली. अनेक प्रयत्न केल्यानंतरही बाजीच्या साहाय्याने बिबट्या वर येत नसल्याने विहिरीत शिडी सोडण्यात आली. मात्र थकलेला मादी बिबट्या शिडीने निम्मे अंतर वर आल्यानंतर पुन्हा खाली जात होती.
रविवारी दिवसभर बिबट्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले. रविवारी पुन्हा बिबट्याला विहिरीत मुक्काम करावा लागला. विहिरीत पाण्यात पोहून व भुकेने व्याकूळ झालेल्या बिबट्याचा दोन दिवस विहिरीत मुक्काम झाल्यानंतर त्याला वनविभागाकडून विहिरीतून बाहेर काढण्याची अपेक्षा लागून राहिली होती.
त्यानंतर सोमवारी सकाळी मनीषा जाधव यांनी उपवनसंरक्षक पंकज गर्ग, सहाय्यक वनसंरक्षक अनिल पवार यांच्यासोबत संपर्क साधून त्यांच्या मार्गदर्शनाखाली विहिरीत क्रेन सोडण्याचा निर्णय घेतला. सिन्नरच्या टीमला नाशिक रेस्क्यू टीम मदतीला आली. सोमवारी (दि.१६) सकाळी क्रेनला पिंजरा बांधून पिंजरा विहिरीत सोडण्यात आला. कपारीजवळ पिंजरा जाताच बिबट्याने पिंजऱ्यात उडी घेतल्याने त्याला विहिरीतून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर बिबट्याची रवानगी वनविभागाच्या मोहदरी वनउद्यानात करण्यात आली.
दोन दिवस विहिरीत मुक्काम केलेल्या बिबट्याला वाचविण्यात वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव यांच्यासह प्रीतेश सरोदे, विवेक भदाणे, रावसाहेब सदगीर, रोहित शिंदे, आकाश रूपवेत, कैलास सदगीर, किरण गोर्डे, सोमनाथ गाडवे या सिन्नर व नाशिक रेस्क्यू पथकाने बिबट्याला वाचविण्याची कामगिरी फत्ते केली.
कोट...
बिबट्या ज्या विहिरीत पडला तो विहिरीचा कठड्याचा भाग धोकादायक होता. रेस्क्यू करताना विहिरीत पडण्याचा धोका होता. यापूर्वी आम्ही ताडोबा व्याघ्र प्रकल्पात असे रेस्क्यू केले असल्याने त्या अनुभवाचा फायदा झाला. बिबट्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढता आले त्याचे समाधान आहे.
- मनीषा जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी,
(१६ सिन्नर बिबट्या, १)
....सिन्नर तालुक्यातील कोनांबे शिवारात विहिरीत पडलेल्या बिबट्याने कपारीला घेतलेला आधार.
.....कोनांबे शिवारात विहिरीत पडलेल्या बिबट्याने क्रेनने बाहेर काढण्यात आले.
160821\16nsk_79_16082021_13.jpg~160821\16nsk_80_16082021_13.jpg
सिन्नर तालुक्यातील कोनांबे शिवारात विहिरीत पडलेल्या बिबट्याने कपारीला घेतलेला आधार.~कोनांबे शिवारात विहिरीत पडलेल्या बिबट्याने क्रेनने बाहेर काढण्यात आले.