सायखेडा : येथील गोदानगर भागात काही दिवसांपासून दर्शन देणारा बिबट्याचा बछडा वनविभागाने पिंजरा लावत जेरबंद केला. जेरबंद बछड्याला बाहेर काढण्यासाठी मादीने जमीन उकरण्याचा प्रयत्नही केला. वनक्षेत्रपाल अधिकारी बी. आर. डाकरे, प्रसाद पाटील, एस. पी. हिरे, वनरक्षक व्ही. आर. टेकनर, वनसेवक विजू लोंढे, दत्तू अहिरे, रामचंद्र गादे, संजू दाने, दर्शन दराडे, भारत माळी यांनी या बछड्याला जेरबंद केले. गोदानगर परिसरात उसाचे शेत आहे. याअगोदर अनेकवेळा बिबट्याचे दर्शन झाले होते. याच परिसरात चार महिन्यांपूर्वी आई शेतात काम करत असताना मागे उभ्या असलेल्या चार वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला. त्यात मुलाचा मृत्यू झाला. त्याच परिसरात काही दिवसांपासून बिबट्या दिसत असल्यामुळे शेतकरी, शेतमजूर यांच्यात भीती निर्माण झाली आहे. बछडा जरी जेरबंद झाला असला तरी मादी पकडली जात नाही तोपर्यंत भीती कायम राहील. त्यामुळे वनविभागाने जास्त पिंजरे लावून मादीला जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य गणेश कातकाडे यांनी केली आहे. (वार्ताहर)
सायखेडा येथे बिबट्याचा बछडा जेरबंद
By admin | Updated: January 13, 2017 00:55 IST