जायखेडा: करंजाड (ता.बागलाण) शिवारातील चिंचबारी, पाटगादा व पिंगळवाडे परिसरात बिबट्याने गेल्या अनेक दिवसांपासून धुमाकूळ घातला असून पाटगादा शिवारात शुक्रवारी (दि.१४) बिबट्याने भरदिवसा गायीवर हल्ला चढवत तिला ठार मारल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वेळा वनविभागाला कळवूनही हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.पाटगादा शिवारातील शेतकरी प्रवीण बाळू देवरे यांच्या शेतात गायी चारण्यासाठी सोडण्यात आल्या होत्या. दुपारी चार वाजेच्या सुमारास अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने गायीवर हल्ला चढविल्याने गायीचा मृत्यू झाला. याच वेळी सोबत बांधलेल्या इतर गायींनी दोरखंड तोडून पळ काढला. गायी भेदरलेल्या अवस्थेत सैरभैर धावत असल्याचे पाहून आसपासचे नागरिक गायी बांधलेल्या जागेत गेले असता बिबट्या गायीवर ताव मारत असल्याचे निदर्शनास आले. नागरिकांनी आरडाओरडा केला मात्र तोपर्यंत बिबट्याने गायीचा फडशा पाडला होता. गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असल्याने शेतक-यांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाला याबाबत अनेक वेळा तक्र ारी करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप केवळ देवरे यांनी केला आहे. बिबटया भरदिवसा दर्शन देत असल्याने शेतमजूर भीतीमुळे शेतात जाण्यास तयार होत नाही. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतक-यांनी केली आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 18:25 IST
वनविभागाला कळवूनही हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप
बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार
ठळक मुद्देचार वाजेच्या सुमारास अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने गायीवर हल्ला चढविल्याने गायीचा मृत्यू झाला.