सिडको : येथील राणाप्रताप चौकासह परिसरात आज दुपारी पिसाळलेल्या कुत्र्याने तीन वर्षांच्या बालकासह पंधरा जणांना चावा घेतला. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली. मनपाच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काही वेळातच कुत्र्यास पकडल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सिडकोतील औदुंबर बस थांबा, राणाप्रताप चौक या भागात दुपारी चार वाजेच्या सुमारास अचानक एका पिसाळेल्या कुत्र्याने तेजस गिरी (१८), सचिन ठाकणे (३), ऊर्वशी शिंदे (६), प्रिया धेंडे (१०) तसेच सत्यम शेट्टे यांच्यासह सुमारे पंधरा जणांना चावा घेतला. भाजपा युवा मोर्चाचे सिडको विभागाचे पदाधिकारी तेज निरभवणे यांनी याबाबत मनपा आरोग्य विभागाचे कर्मचारी दीपक लांडगे यांना कळविले. लांगडे यांनी तातडीने कुत्रे पकडण्याची गाडी व कर्मचाऱ्यांना पाठवून कुत्र्याला पकडण्यात आले आहे. दरम्यान, सिडको, कामटवाडे, कोकण भवन यांसह परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली असून, या मोकाट कुत्र्यांमुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्रीच्या वेळी कामावर जाणाऱ्या व कामावरून येणाऱ्या कामगारांनाही मोकाट कुत्र्यांच्या वावरामुळे त्रास सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)
पिसाळलेल्या कुत्र्याने तीन वर्षांच्या बालकासह पंधरा जणांना चावा घेतला.
By admin | Updated: November 12, 2014 01:50 IST