पेठ : तालुक्यातील आडगाव (भू.) येथील शेतात काम करणाऱ्या दोन जणांवर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याने परिसरात एकच घबराट पसरली आहे.आडगाव येथील लहानू खुरकुटे हे शेतात काम करत असताना जंगलाच्या दिशेने आलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. यात बेसावध खुरकुटे जमिनीवर कोसळले हे पाहून जवळच असलेल्या भास्कर गायकवाड या तरुणाने त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली असता चवताळलेल्या बिबट्याने त्यांच्यावरही हल्ला चढवला. त्यात दोघे जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने पळ काढला. जखमींना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचारानंतर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.या भागात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याने दर्शन होत असून, बकऱ्या, कोंबड्या, जनावरे फस्त करणाऱ्या बिबट्याने आता माणसांनाच टार्गेट केल्याने शेतात काम कसे करावे, असा प्रश्न ग्रामस्थांत निर्माण झाला आहे. वनविभागाने या भागात पिंजरा लावावा, अशी मागणी करण्यात येत आहे. (वार्ताहर)
बिबट्याचा हल्ला; दोन जखमी
By admin | Updated: July 23, 2014 00:23 IST