नाशिक :पेठ तालुक्यातील पायरपाडा येथील चौदा वर्षीय शाळकरी मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना मंगळवारी घडली़ या मुलाच्या उजव्या खांद्यावर बिबट्याने पंजा मारला असून, त्यास उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, पेठ तालुक्यातील पायरपाडा येथील पोपट उमाकांत बोरसे (१४) हा नाचलोंडी येथील माध्यमिक विद्यालयात इयत्ता आठवीला आहे़ मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे मुलांसोबत शाळेत जात असताना घराजवळ दडून बसलेला बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला़ बिबट्याने मारलेल्या पंजामध्ये त्याच्या उजव्या खांद्यावर जखम झाली, तर इतर मुलांनी व नागरिकांनी आरडा-ओरड केल्याने बिबट्या पळून गेला़ बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पोपट बोरसेला उपचारासाठी त्याचे काका हरी बोरसे यांनी प्रथम हरसूल ग्रामीण रुग्णालयात व नंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे़ या घटनेची हरसूल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)
पेठमध्ये मुलावर बिबट्याचा हल्ला
By admin | Updated: April 1, 2015 01:01 IST