नाशिक : जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीनजीक असलेल्या पूर्वीच्या उपाहारगृहास आता विरोधी पक्षाच्या गटनेत्यांचे कक्ष कार्यालय बनविले असून, या कार्यालयावर नजीकचे पिंपळाचे झाड पडून त्याच्या पत्र्याची तुटफूट झाल्याचे समजते. उपाध्यक्ष तथा बांधकाम व अर्थ समिती सभापती प्रकाश वडजे यांनी या प्रकरणी संबंधित मक्तेदारास धारेवर धरत तुटलेल्या पत्र्यांची तत्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहेत.जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीनजीकच आवारात पूर्वी छोेटेखानी उपाहारगृह होते; मात्र संबंधित उपाहारगृहाच्या मालकाने उपाहारगृहाचे कररूपी शुल्क थकविल्याने हे उपाहारगृह बंद करण्याची कार्यवाही त्यावेळी सामान्य प्रशासन विभाग व बांधकाम विभाग यांनी संयुक्तरीत्या केली होती. तत्कालीन अध्यक्ष जयश्री पवार यांनी विरोधी गटनेत्यांना बस-उठ करण्यासाठी या उपाहारगृहालाच विरोधी गटनेत्यांचे कक्ष कार्यालय करण्यास मंजुरी दिली होती. त्यानंतर या कक्ष कार्यालयाच्या उभारणीपोटी लाखो रुपयांची उधळपट्टी बांधकाम विभागाने केली. प्रत्यक्षात या कार्यालयाचे उद्घाटन जानेवारी महिन्यात होऊनही नंतर पुन्हा या कार्यालयाचा विरोधी गटनेत्यांनी वापरच केला नाही. तसेच दरम्यानच्या काळात या कार्यालयावर झाडाची फांदी तुटून पडल्याने त्या कार्यालयाचा सीमेंटचा पत्रा फुटला आहे. अवेळी पावसाने हजेरी लावल्यानंतर या कार्यालयाला मध्यंतरी गळती लागल्याची चर्चा होती. (प्रतिनिधी)
विरोधी गटनेत्यांच्या कक्षाला ‘गळती’
By admin | Updated: November 12, 2014 00:18 IST