लोकमत न्यूज नेटवर्कदिंडोरी : दिंडोरी तालुक्यातील गुजरातला जाणारा व्यापाऱ्यांचा शेतमाल रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांकडून पिंप्री आंचला येथे लाठीमार करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल रोखून धरण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. संप काळात नफेखोरी करणाऱ्या व्यापाऱ्यांचा माल पोलिसांच्या मदतीने गुजरातमध्ये गेला असून, गुजरात मार्गावर चोरटी शेतमाल वाहतूक रोखणाऱ्या शेतकऱ्यांवर ठिकठिकाणी पोलिसांनी लाठीमार केला. पोलिसांच्या लाठीमारात काही शेतकरी जखमी झाल्याचेही समजते. संपाचे पहिले दोन दिवस शेतकऱ्यांनी नाशिक सापुतारा नाशिक, बलसाड पिंपळगाव सापुतारा या गुजरातला जोडणाऱ्या मार्गांवर जागता पहारा ठेवत गुजरातला जाणारा भाजीपाला दूध रोखले होते. शनिवारी पहाटे संप मिटल्याच्या कथित वृत्तानंतर अनेक रोखलेली वाहने पोलिसांच्या मदतीने रात्रीतून पसार झाली. मात्र सकाळी शेतकऱ्यांचे संपावरील तोडग्यावर समाधान न होता हा संप पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा रस्त्याने जाणारा शेतमाल रोखण्याची भूमिका घेतली.
पिंपरी आंचला येथे लाठीमार
By admin | Updated: June 4, 2017 02:01 IST