महापालिकेतील ५५ लेटलतिफ कर्मचाऱ्यांना आयुक्त कासार यांनी गुलाबपुष्प देऊन मुख्य प्रवेशद्वारावरच त्यांचे स्वागत केले. गुलाबपुष्प देण्याच्या गांधीगिरीसह त्यांचे एकदिवसाचे वेतन कपात करण्याचे निर्देशही आस्थापना विभागाला दिले आहेत. त्यामुळे उशिरा येणाऱ्या कर्मचार्यांचे धाबे दणाणले आहेत. शासनाने पाच दिवसांचा आठवडा केल्यामुळे शनिवारी व रविवारी सुटी असते. त्यामुळे कार्यालयीन कामकाजाची नियमित वेळ पाच दिवसांचा आठवडा करताना वाढविण्यात आलेली आहे. शासकीय कार्यालयीन कामकाजाची वेळ ही सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी आहे. मात्र शासकीय कार्यालयातील बऱ्याच अधिकारी, कर्मचारी यांना अजूनही जुन्या सकाळी १० ते सायंकाळी ६ याच कार्यालयीन वेळेची सवय आहे. कर्मचाऱ्यांना कामाचे व वेळेचे तसेच जबाबदारीचे भान असावे, यासाठी आयुक्त कासार यांनी महापालिका मुख्यालयातील सर्व कार्यालयांना सकाळी दहा वाजेपूर्वी भेट देऊन हजेरी नोंदवहीची तपासणी केली.
इन्फो
मास्क न वापरणाऱ्यांना तंबी
बहुतांश जबाबदार कर्मचारी, अधिकारी गैरहजर आढळून आल्याने हजेरी नोंदवही ताब्यात घेऊन शुक्रवारी (दि.२९) सकाळी आयुक्त कासार स्वतः महापालिका मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर खुर्ची टाकून आस्थापना पर्यवेक्षक यांच्यासह ठाण मांडून बसले. उशिरा आलेल्या प्रत्येक महिला व पुरुष अशा सर्वप्रकारच्या कायम व मानधन अधिकारी कर्मचारी यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. उशिरा येणाऱ्या एकूण ५५ कर्मचाऱ्यांमध्ये ३२ कायम, तर २३ मानधन कर्मचाऱ्यांचा समावेश होता. यात काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश होता. यावेळी आयुक्तांनी मास्क न वापरणाऱ्यांनाही तंबी देऊन लगेच मास्क घालायला लावला. कारवाईवेळी मनपाचे सर्व व प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. तरीही काही कर्मचाऱ्यांनी इतर माध्यम व खिडक्यांमधून प्रवेश करण्याचा निष्फळ प्रयत्न केला.