लासलगाव : येथील गजबजलेल्या कोटमगाव रस्त्यावर उभ्या असलेल्या कांदा व्यापाऱ्याच्या वाहनातून चोरट्यांनी चौदा लाख रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला. मंगळवारी दुपारी पाऊण वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पाळत ठेवून सदर लूट करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.उमराणे येथील कांद्याचे व्यापारी शिवाजी देवरे यांनी दुपारी बारा वाजता कांदा उत्पादकांचे पैसे देण्यासाठी स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या लासलगाव शाखेतून चौदा लाख रुपयांची रक्कम काढली होती. सदर रक्कम कापडी पिशवीत ठेवून सफेद रंगाच्या टाटा मांझा (एमएच ४१ आर ९६९६) कारने कोटमगाव रस्त्यावरील आयसीआयसीआय बँकेच्या शाखेसमोर आले. त्यांना अजून काही रक्कम काढायची असल्याने ते चौदा लाखांची पिशवी तशीच ठेवून बॅँकेत गेले. त्यानंतर वाहनचालक समाधान खैरनार हेदेखील लघुशंका करण्यासाठी वाहनातून खाली उतरले. परत आल्यावर चालकाला गाडीची मागील काच फोडून अज्ञात चोरट्यांनी कापडी पिशवीत ठेवलेली चौदा लाख रुपयांची रोकड लंपास केल्याचे निदर्शनास आले. त्याने तत्काळ देवरे यांना सदर प्रकार सांगताच त्यांनी लासलगाव पोलिसाशी संपर्क साधून फिर्याद दिली. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. बी सानप करीत आहेत. (वार्ताहर)
लासलगावी भरदिवसा चौदा लाख लंपास
By admin | Updated: June 10, 2015 00:01 IST