सिडकोत पिण्याच्या पाण्यात आढळल्या अळ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 12:40 AM2018-06-13T00:40:02+5:302018-06-13T00:40:02+5:30
येथील प्रभाग क्रमांक २९ मधील साईबाबानगर परिसरात चक्क पिण्याच्या पाण्यात अळ्या आढळल्या असून, महानगरपालिकेच्या ढिसाळ ब नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. मनपाने पाणी पुरवठा त्वरित सुरळीत न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
सिडको : येथील प्रभाग क्रमांक २९ मधील साईबाबानगर परिसरात चक्क पिण्याच्या पाण्यात अळ्या आढळल्या असून,महानगरपालिकेच्या ढिसाळ ब नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. मनपाने पाणी पुरवठा त्वरित सुरळीत न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे. सिडकोत बहुतांश भागात पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन व ड्रेनेज पाइपलाइन एकाच ठिकाणाहून गेलेले असल्याने अनेकदा नागरिकांना ड्रेनेज मिश्रित पाणीपुरवठा होत असल्याचे प्रकार झाले आहे. असाच प्रकार मंगळवारी सिडकोतील साईबाबानगर परिसरात घडला असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यातून जंतू, अळ्या, किडे आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती नागरिकांनी प्रभागाचे नगरसेवक मुकेश शहाणे यांना दिली यानंतर परिसरातील महिला व नागरिकांनी पिण्याच्या पाण्यातून आलेले अळ्या, किटके आलेले पाणी दाखविले. या पाण्याला दुर्गंधी येत होती. शहाणे यांनी मनपा पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली असता मनपाच्या अधिका-यांनी तत्काळ परिसराला भेट दिली. संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी जलवाहिनी तपासणी काम सुरू केले आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने हा प्रकार घडत असल्याने साईबाबानगर परिसरात पाणीपुरवठा सुरळीत करावी, अशी मागणी संगीता पाटील, सुनंदा हाडोळे, चंद्रकला गायकवाड, सुनंदा जाधव, शिवांगी सोनार आदींसह महिला व नागरिकांनी केली आहे.