नांदूरशिंगोटे : नाशिक - पुणे महामार्गावरील नांदूरशिंगोटे येथे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास पाच दुकाने फोडून सुमारे लाखभर रुपयांचा ैऐवज चोरट्यांनी लुटला. एकाच रात्री पाच ठिकाणी घरफोडी झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. एका संशयितास सिन्नर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. येथील नवीन चास रस्त्यालगत तीन तर जुन्या चास रस्त्यालगत दोन असे पाच दुकानांचे शटर वाकवून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. येथील कृषी उत्पन्न व्यापारी संकुलातील साईचरण शू वर्ल्ड या दुकानाच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे फोडून दुकानातील बुट, चपलांचे जोडे, दोन हजार रुपये रोख असे मिळून सुमारे वीस हजारांचा ऐवज लुटला. त्यानंतर जवळील तिरंगा मोबाइल दुरुस्तीच्या दुकानातून इन्व्हर्टर, दूरचित्रवाणी संच, मोबाइलच्या बॅटऱ्या, दुरुस्तीसाठी आलेले मोबाइल, त्यांचे सुटे भाग मिळून सुमारे ३० हजारांचा माल लंपास केला. येथील सद्गुरु किराणा दुकानात चोरटे घुसले. तेथे त्यांच्या हाती खूप काही लागले नाही. मात्र गूळ-शेंगदाण्यावर ताव मारून दुकानातील कॅटबरी, चॉकलेट, चिल्लर व किरकोळ माल मिळून सुमारे दोन हजाराचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. या दुकानासमोरच लक्ष्मण शेळके यांची वस्ती आहे. तेथे शरद गणपत वाघ यांची मोटारसायकल उभी होती. तिचे हँटलचे कुलूप तोडून ती रस्त्यावर लोटून आणली मात्र पेट्रोल नसल्याने ती चालू होऊ शकली नाही. त्यामुळे चोरट्यांनी ती दुचाकी मुंगसे यांच्या आडत दुकानाजवळ सोडून तेथून जुन्या चास रस्त्याकडे मोर्चा वळविला. या भागातील साई इलेक्ट्रिकल्स व मोबाइल दुरुस्तीच्या दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश केला. त्यातील एक लॅपटॉप, जुने मोबाइल, सीमकार्ड मिळून सुमारे ४० हजार रुपयांचा ऐवज लांबविला. त्यानंतर जवळील ओम कृष्णा मेडिकल या औषधांच्या दुकानात चोरटे शिरले. मात्र त्यात त्यांच्या हाती काही लागले नाही. या प्रकरणी येथील अलील इनाम शेख यांनी चोरीची फिर्याद दाखल केली असून, वावी पोलिसांनी चोरट्यांचा शोध लावण्यासाठी नाशिक येथील श्वान पथक व ठसे तज्ज्ञाना पाचारण केले होते. श्वानपथकाने महामार्गापर्यंत चोरट्यांचा माग दाखविला. दरम्यान, आज सकाळी सिन्नर येथील लोंढे गल्लीतून जाणाऱ्या एक संशयित पोलिसांच्या हाती लागला असून, त्याच्याकडील लॅपटॉप व आदि मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. (वार्ताहर)
नांदूरशिंगोटेतून लाखोंचा ऐवज लंपास
By admin | Updated: September 26, 2014 23:52 IST