लोकमत न्यूज नेटवर्कसटाणा : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यावा, स्वामिनाथन आयोग लागू करावा आदी मागण्यांबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी थातुरमातुर घोषणा करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याच्या निषेधार्थ सोमवारी (दि.५) शेतकरी क्रांती मोर्चाचे समन्वयक पप्पूतात्या बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली लखमापूर येथील बसथांब्यावर सकाळी १० वाजता संतप्त शेतकऱ्यांनी ठिय्या देऊन दीड तास सटाणा -मालेगाव वाहतूक रोखून धरली. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. अखेर सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बशीर शेख यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर दीड तासांनी आंदोलन मागे घेण्यात आले. या चक्काजाममुळे महामार्गाच्या दुतर्फा दोन ते तीन किलोमीटर लांब वाहनांची रीघ लागली होती. आंदोलन मागे घेतल्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. आंदोलनात मविप्रचे उपसभापती नानाजी दळवी, माजी सरपंच केवळ दळवी, अशोक बच्छाव, प्रवीण भामरे, सागर बच्छाव, सागर दळवी, तुषार बच्छाव, बबलू चव्हाण, पप्पू निकम, युवराज पानपाटील, नीलेश दळवी, बारकू दळवी, राकेश काकडे आदी सहभागी झाले होते. दरम्यान, जुनी शेमळी येथे माजी सरपंच भारत बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ९ वाजता सटाणा- मालेगाव रस्ता अडवून धरला. एक तास रास्ता रोको केल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलक शेतकऱ्यांनी रस्तावर टायर जाळल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केल्याने तासभरानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात सरपंच अमोल बच्छाव, साखरचंद बच्छाव, गणेश बागुल आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
लखमापूर, धांद्री, शेमळीत चक्काजाम
By admin | Updated: June 6, 2017 01:48 IST