नाशिक : उन्हाळ्याच्या सुटींमुळे रक्तदात्यांची संख्या रोडवली असून, शहरातील रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठा सरासरीपेक्षा सुमारे ३० ते ४० टक्के कमी झाला आहे. दरम्यान, शहर व परिसरात वाढते अपघात, शस्त्रक्रियेच्या काळात लागणारी रक्ताची अतिरिक्त गरज, विविध परीक्षांच्या कालावधीमुळे रक्तसंकलन शिबिराचे घटलेले प्रमाण यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना रक्तासाठी धावाधाव करावी लागत आहे.दरवर्षी एप्रिल आणि मे या दोन महिन्यात रक्तसंकलनाचे प्रमाण कमी होते तसेच महाविद्यालयांना सुटी असल्यामुळे रक्तदान शिबिराची संख्यादेखील थंडावलेली असते. उन्हाळा आरोग्यासाठी त्रासदायक असल्याने रक्तदानासाठी सहसा कोणीच तयार होत नाही. त्यातच लग्नसराईचे दिवस असल्यामुळे बहुतांश कुटुंबीयांनी सहलीचे नियोजन केले आहे. सध्याच्या काळात अनेक सामाजिक संस्था व राजकीय पक्षांनीदेखील रक्तदान शिबिराचे नियोजन केले नसल्याने शहरातील सर्वच रक्तपेढ्यांकडे मागणीपेक्षा साठा कमी असल्याचे सांगण्यात येते. सध्याच्या काळात अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. तसेच अनेक रुग्णालयांमध्ये नियोजित शस्त्रक्रिया केल्या जातात. तद्वतच जिल्हा रुग्णालयातील मेट्रो ब्लड बँकेला जननी सुरक्षा अभियानांतर्गत गर्भवती महिलांना प्रसूतीदरम्यान रक्तपुरवठा करण्यात येतो. याशिवाय हिमोफेलिया, थॅलेसेमिया, सिकलसेल या रुग्णांना नियमित रक्त द्यावे लागते. त्यामुळे सध्याच्या काळात रुग्णांना रक्तपुरवठा करण्यात अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे रक्तपिशव्यांची चणचण निर्माण झाली आहे, असे शहरातील रक्तपेढ्यांकडून सांगण्यात येते.
रक्तपेढ्यांमध्येच रक्ताचा तुटवडा : रुग्णांचे हाल
By admin | Updated: May 8, 2017 23:05 IST