नकदी पीक म्हणून या भागातील शेतकरी पोळ कांद्याची लागवड करीत असतात. मागील वर्षी पोळ कांद्यास चांगला बाजारभाव मिळाला. यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा बियाणे टाकले असून, गेल्या काही दिवसांपासून कांदा रोपे लागवडी योग्य झाली आहे.
गेल्या सहा-सात दिवसांपासून परिसरात कांदा लागवडीस वेग आला आहे. मागील आठवड्यापासून परिसरात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत असून, या पावसामुळे कांदा रोपे झोडपून निघाली आहे. त्यातच गेल्या तीन दिवसांपासून या भागात धुके पडत असल्याने कांदा रोप खराब होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गासमोरील अडचणी वाढत चालल्या आहे.
या भागातील शेतकरी हे पोळ (लाल कांदा) रांगडा कांदा व उन्हाळ कांदा आशा हंगामात कांदा पीक घेत असतो. कांद्यास चांगला दर मिळत असल्याने शेतकरी वर्ग पोळ कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात करीत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी पंधरा ते सोळा हजार रुपये पायली दराचे बियाणे खरेदी करून रोप तयार केले आहे.
चौकट...
पायलीभर बियाणांसाठी बारा हजार
मागील वर्षी पोळ व रांगडा कांद्यास चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी तयार झालेला कांदा विक्री केला. साहजिकच कांदा बियाणे तयार करण्यास शेतकऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने यंदा बियाणे टंचाई निर्माण झाली आहे. एक पायली बियाणासाठी शेतकऱ्यांना दहा ते बारा हजार रुपये मोजावे लागत आहे.