नाशिक : उज्जैन व अलाहाबादच्या धर्तीवर नाशिकलाही सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करण्यात यावे, साधुग्रामसाठी कायमस्वरूपी जागा आरक्षित ठेवण्यात यावी, तसेच नवीन शाहीमार्गाबाबत आखाड्यांच्या महंतांशी कोणतीही चर्चा केलेली नाही, त्यामुळे नवीन शाहीमार्गाला दिगंबर अनी आखाड्याचा विरोधच राहील, असे एका पाठोपाठ एक वाक्बाण साधू-संतांनी सिंहस्थांच्या आयोजित बैठकीत मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांवर निशाणा साधला.नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित सिंहस्थ आढावा बैठकीत दिगंबर निर्मोही आणि दिगंबर अनी आखाड्याच्या साधू-महंतांसह स्थानिक साधू-महंतांनी वेगवेगळ्या मागण्या मांडल्या. दिगंबर निर्मोही आखाड्याचे महंत भक्तिदास महाराज यांनी सांगितले की, आमचे ६५० खालसे असून, सिंहस्तासाठी नाशिकच्या तपोवनात किमान पाचशे एकर कायमस्वरूपी जागा हवी. कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी ‘कुंभमेळा प्राधिकरण समिती’ नेमण्यात यावी. त्यात या आखाड्यांच्या महंतांचा समावेश असावा. कायमस्वरूपी साधुग्राम उभारल्यास बाराही वर्षे तेथे धार्मिक कार्यक्रम होऊ शकतील. नाशिकच्या सिंहस्थाचा प्रचार व प्रसार आणखी जोमात व्हावा, असे सांगितले. दिगंबर अनी आखाड्याचे महंत रामकिशोर शास्त्री यांनी सांगितले की, आमच्या आखाड्याच्या कोणत्याही महंतांना विश्वासात न घेताच पर्यायी शाहीमार्ग निवडण्यात आला आहे. मुळातच मागील वेळीही स्मशानभूमीवरून जाणारा पर्यायी मार्ग आम्ही नाकारला होता. त्यामुळे यावेळीही तीच शक्यता अधिक आहे. तपोवनात साधुग्रामसाठी जागा दिवसेंदिवस कमी होत असल्याने आतापासूनच साधुग्रामसाठी जागा कायमस्वरूपी आरक्षित न केल्यास पुढील कुंभमेळा होईल की नाही, अशी शंका आहे. मागील वेळी चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली होती. त्यामुळे सिंंहस्थ यशस्वी करण्यासाठी साधू-महंतांना विश्वासात घ्यावे, तसेच मंदिरांच्या देखभाल दुरुस्तीवर लक्ष पुरवावे, असे शास्त्री यांनी सांगितले.
नाशिकलाही सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण स्थापन
By admin | Updated: February 22, 2015 01:43 IST