शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे ‘पोश्टर बॉईज’ं

By admin | Updated: September 14, 2014 00:50 IST

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे ‘पोश्टर बॉईज’ं

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विश्वस्तपद हे काही लाभाचे पद नाही, परंतु त्याने प्रतिष्ठा मात्र जरूर लाभते. एकेकाळी कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळात आपला शिरकाव व्हावा, यासाठी प्रतिष्ठित मंडळी प्रतीक्षायादीत असायची. प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाची पाटी पाहिली, की अभ्यासू, चिंतनशील, संशोधक, साहित्यिक... यांसारख्या विशेषणांनी ती भरलेली असायची. प्रत्येक नावाला एक भारदस्तपणा होता. तात्यासाहेबांचे निर्वाण झाले, काळ सरला तसा विश्वस्त मंडळाच्या पाटीचा रंगही विटला. पूर्वी विश्वस्तांच्या नियुक्त्या व्हायच्या, आता वर्णी लावली जाते. गुणवत्तेचा निकष, तर कधीच गोदावरीत विसर्जित करण्यात आला आहे. अवती-भवती वावरणाऱ्या, मागे-पुढे करणाऱ्या, आपल्या मर्जीतल्या, फार काही कर्तृत्व नसलेल्यांना थेट विश्वस्तपदी विराजमान करण्याचा उद्योग प्रतिष्ठानवरील काही मंडळी गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून करत आली आहेत. तात्यासाहेबांच्या निर्वाणानंतर प्रतिष्ठानपासून दुरावलेल्या काही लोकांना हा उद्योग असह्य करत असतो, पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधायला कोणी पुढे येत नाही. काही तरुण मंडळी या मांजराच्या पेकाटात धपाटा घालण्याची आवेशपूर्ण चर्चा करतात; परंतु या बिळातल्या गप्पा बिळातच विरतात. प्रतिष्ठानच्या सातबाऱ्यावर काही मंडळींनी आपली नावे कायमची लावून घेतली आहेत आणि खातेफोड करायला ते कधीच इच्छुक नसतात. प्रतिष्ठानवर जर विश्वस्तपदी जायचे असेल, तर क्वॉलिफिकेशन ठरलेले आहे. एक तर तुमच्या हाती बॅँक असली पाहिजे आणि त्या बॅँकेचे तुम्ही सर्वेसर्वा असला पाहिजे, तुम्ही भरभक्कम पैसा मोजलेले देणगीदार असले पाहिजे अथवा तुमच्या पित्याची पुण्याई तरी गाठीशी असली पाहिजे. एखादाच कीर्तनकाराचा मुलगा आपल्या प्रतिभेच्या बळावर उपाध्यक्षपदापर्यंत पोहोचू शकतो. गेल्या काही वर्षांत प्रतिष्ठानवर ज्या काही लोकांची वर्णी लावण्यात आली आहे, ते पाहता हे ‘पोश्टर बॉईज’ प्रतिष्ठानचा खूप काही लौकिक वाढवतील, याची खात्री छातीठोकपणे नाशिककर देऊ शकणार नाहीत. गेल्या दोन-अडीच महिन्यांत विश्वस्त मंडळात बरेच फेरबदल झाले आहेत; परंतु त्यात प्रत्यक्षात कामाचे किती आणि सातबारावर नावे असलेल्या मामांचे जावई अथवा भाचेबुवा किती याचा लगेच अंदाज येतो. नव्यानेच नियुक्त झालेल्या अध्यक्षांनी, तर पदभार स्वीकारण्यापूर्वीच वयोमानामुळे आपण पदाला खूप काही न्याय देऊ शकेल, असे वाटत नसल्याचे सांगून टाकले आहे. त्यामुळे त्यांच्या हातून जे काही सत्कार्य घडेल, ते प्रतिष्ठानच्या बोनस खात्यात जमा होईल. सारस्वत बॅँकेचे सर्वेसर्वा एकनाथ ठाकूर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या उपाध्यक्षपदी कवी किशोर पाठक यांना बढती देण्यात आली आहे. कविश्रेष्ठाच्या प्रतिष्ठानवर एका कवीची नियुक्ती होणे हे समर्थनीय आहे आणि त्यांच्या हाती सोपविलेल्या साहित्यभूषण परीक्षेच्या व्यवहारात कुठे खोट दिसून येत नसल्याने सध्या तरी त्यांच्या नियुक्तीला कुणी आक्षेप नोंदवेल, असे वाटत नाही. भविष्य कोणाच्याच हाती नाही. मुळात एकनाथ ठाकूर यांची नियुक्ती ही त्यांच्या सारस्वत बॅँकेने जन्मशताब्दी वर्षात दिलेल्या भरघोस देणगीमुळे झाली होती, हे वास्तव कुणीही नाकारणार नाही. (एकनाथ ठाकूर ही इतकी मोठी व्यक्ती होती की, त्यांनी देणगीच्या बदल्यात माझी प्रतिष्ठानवर नियुक्ती करा, असे कधीही सांगितले नसेल.) विश्वस्त मंडळावर अरविंद ओढेकर, गायक मकरंद हिंगणे आणि डॉ. विनय ठकार या तिघांची नुकतीच वर्णी लावण्यात आली आहे. अरविंद ओढेकर हे नशीबवानच म्हणायला हवे. त्यांची थेट सहकार्यवाहपदी वर्णी लागली आहे. म्हणजे आता कार्यवाह लोकेश शेवडे यांची स्टोअरवेल ओव्हरफ्लो झाली, की मोटार बंद करायला ओढेकर आहेतच. शिवाय पूर्णवेळ कार्यकर्ताही मिळाल्याने शेवडे आपल्या उद्योगधंद्यात जास्त लक्ष घालू शकतील. गायक मकरंद हिंगणे यांना मात्र त्यांच्या कामाची पावती मिळाली, असे म्हणता येईल. हिंगणे यांनी गेल्या दोन-तीन वर्षांपासून प्रतिष्ठानचा संगीत विभाग ज्या पद्धतीने हाताळला आहे, ते पाहता हिंगणे यांची नियुक्ती योग्य ठरते. प्रतिष्ठानची शास्त्रीय संगीत स्पर्धा त्यांनी सर्वदूर पोहोचविली आहे. हिंगणे यांना निर्णयस्वातंत्र्य मिळाले, तर संगीत विभाग खूप मोठी कामगिरी बजावू शकतो. डॉ. विनय ठकार यांचे नाव मात्र अनपेक्षितरीत्या समोर आले आहे. एक धन्वंतरी म्हणून ठकार यांचे नाव परिचित असले, तरी त्यांच्या निवडीबाबत कारभाऱ्यांनी दाखविलेला ‘विनय’ म्हणजे ‘विवेक’ हरविल्याचेच लक्षण आहे. यापूर्वीही प्रतिष्ठानवर अशाच एका धन्वंतरीची नियुक्तीही प्रश्न उपस्थित करणारीच ठरली होती. वडिलांच्या पुण्याईवर मुलाची अथवा मुलीची विश्वस्त मंडळावर वर्णी लावली जात असेल, तर संबंधित मुला-मुलीनेही जबाबदारीचे भान ठेवले पाहिजे. परंतु प्रतिष्ठानवर नात्यागोत्यातल्या अशा ज्या काही नियुक्त्या झाल्या असतील त्यांनी केवळ गंध-पावडर लावून येण्यापलीकडे आपले फार काही कर्तृत्व सिद्ध केलेले नाही. प्रतिष्ठानवर फादर फ्रान्सिस दिब्रेटो नावाचे एक मोठे सारस्वत सदस्य म्हणून नियुक्त झालेले आहेत. परंतु वार्षिक सभांनाही हजेरी न लावणाऱ्या या सारस्वतामुळे प्रतिष्ठानला खूप काही लाभ झाला, असे म्हणणे कारभाऱ्यांनाही धाडसाचे वाटेल. प्रतिष्ठानवर इतरही काही ‘पोश्टर बॉईज’ आहेत. अधूनमधून ते प्रतिष्ठानच्या कार्यक्रमांमध्ये झळकत असतात. त्यात काही ‘मस्टर बॉईज’ही आहेत, जे स्मारकात नेहमी हजेरी लावताना दिसून येतात. विद्यमान विश्वस्त मंडळात तीन लोक बाहेरचे सोडले, तर भूमिपुत्रांना स्थान देण्यात आले आहे, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब. परंतु भूमिपुत्राची निवड करताना तो राम आहे की केवळ पादुका सांभाळणारा भरत, याचीही दक्षता घेतली गेली पाहिजे. नस्ती भरती काय कामाची !