नाशिक : तपोवनात बटूक हनुमान मंदिराजवळील विद्युत मंडळाच्या सबस्टेशनला लागून असलेल्या पर्णकुटीत राहणाऱ्या दोन साधूंना मारहाण करून त्यांची पर्णकुटी बळकावल्याचे समोर आले आहे़ पर्णकुटी बळकावलेल्या संशयितांकडे आक्षेपार्ह साहित्य आढळल्याने या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी बजरंग दल व विहिंपच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे केली आहे़ याप्रकरणी आडगाव पोलिसांनी एकास ताब्यात घेतले असून, एकजण फरार झाला आहे़ दरम्यान, मारहाण झालेला साधू दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याने गूढ निर्माण झाले आहे़विद्युत सबस्टेशनजवळ दोन पर्णकुट्या असून, त्यातील एकात रामरट्टे, तर दुसऱ्यात राधेश्याम महाराज राहत होते़ सुमारे पंधरा दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी आठ-दहा संशयितांनी या दोन्ही महाराजांना मारहाण करून पर्णकुटीतून पिटाळून लावल्याने त्यांनी बटूक हनुमान मंदिरात आश्रय घेतला होता़ दरम्यान, ही माहिती मिळाल्यानंतर शनिवारी (दि़२३) सकाळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष माधवदास राठी व बजरंग दलाचे नंदू कहार यांनी कार्यकर्त्यांसह धाव घेतली. या घटनेची माहिती त्यांनी आडगाव पोलिसांना देताच यातील एक जण फरार झाला, तर दुसऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतले़ पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित स्वत:चे नाव निकम व आयुर्वेदाचार्य असल्याचे सांगत असून, पोलिसांनी पर्णकुटीची झडती घेतली असता मद्याच्या बाटल्या तसेच एका विशिष्ट समाजाचे साहित्य आढळून आले़ आडगाव पोलिसांनी संशयित निकम यास ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन विहिंप व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी दिले आहे़ यावेळी विहिंप व बजरंग दलाचे विनोद थोरात, पंडित देशमुख, चंदन भास्करे, आकाश भास्कर, ऋ षिकेश काळे, मृणाल घोडके आदिंसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
साधूंना मारहाण करून पर्णकुटी बळकावली
By admin | Updated: January 25, 2016 00:10 IST