नाशिक : राज्यभरात विविध आरोग्य शिबिरांतून वेगवेगळ्या आजारांवर औषधोपचार व शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असल्या तरी अद्याप अशा शिबिरांच्या माध्यमातून किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झालेली नव्हती. ही किमया नाशिक जिल्ह्यात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून साधली गेली असून, राज्यात शिबिराच्या माध्यमातून पहिल्यांदाच नाशिकमध्ये यशस्वीरीत्या किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने आयोजित मोफ त महाआरोग्य शिबिराचा लाखो रुग्णांनी लाभ घेतला. हजारो रुग्णांवर शस्त्रक्रियाही करण्यात आल्या. याच शिबिरात दीपक नाना बेलदार (३२) या रुग्णास किडनी विकार असल्याचे निदर्शनास आले. त्याच्यावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. रुग्णाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे शस्त्रक्रियेसाठी पैशासोबतच अनेक अडचणी येत होत्या. त्याची महारोग्य शिबिरांतर्गत तपासणी झाल्यानंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी डॉ. भाऊसाहेब मोरे यांना ही किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यास सुचविले. डॉ. मोरे यांनी ही शस्त्रक्रिया निम्म्या फीमध्ये करण्याचे कबूल केले. त्यानंतर पालकमंत्री महाजन यांच्या प्रयत्नांतून मुख्यमंत्री सहायता निधीतून २ लाख रुपये मंजूर करण्यात आले. तसेच सिध्दिविनायक चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई व अन्य सामाजिक संस्थांकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यानंतर डॉ. भाऊसाहेब मोरे यांच्यामार्फत किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया दीपक नाना बेलदार यांच्यावर यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. अशाप्रकारे विनामूल्य महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून पहिलीच किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी ठरली आहे. या शस्त्रक्रियेनंतर बेलदार यांना वर्षभरासाठी लागणारे औषधोपचार डॉ. मोरे यांच्या रुग्णालयामार्फत मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रुग्णाचे वडील नाना वना बेलदार यांनी आपली एक किडनी या रुग्णास दान करून आपल्या मुलास पुनर्जन्म प्राप्त करून दिला. ही शस्त्रक्रिया डॉ. भाऊसाहेब मोरे, डॉ. नंदन विळेकर, डॉ. प्रतिक्षीत महाजन, डॉ. प्रणव छाजेड, डॉ. राजेंद्र नेहेते, डॉ. अनिरुध्द ढोकरे, डॉ. श्याम पगार, डॉ. अनिरुध्द चिमोटे, डॉ. योगेश पाटेकर आदिंनी यशस्वी केली. (प्रतिनिधी)
महाआरोग्य शिबिरांतर्गत किडनी प्रत्यारोपण
By admin | Updated: April 2, 2017 01:02 IST