नाशिक : अशोकस्तंभावरील घारपुरे घाट परिसरातील युवकाचा त्र्यंबकेश्वर-जव्हार रोडवरील तोरंगण घाटात तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आल्याची घटना सोमवारी (दि़ ६) सकाळी उघडकीस आली़ मयत युवकाचे नाव वैभव ऊर्फ पिनाजी किसन परदेशी (३३, गोदावरीनगर, तिवारी महलशेजारी, रामवाडी पुलाजवळ) असे आहे़ या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़त्र्यंबकेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास वनरक्षक रूपाली भगवान मोरे यांना आंबईगाव शिवारात आंबा डोंगराच्या पायथ्याशी झोताडी ओहोळाजवळ अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आला़ त्यांनी ही माहिती त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यास दिल्यानंतर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, पोलीस उपनिरीक्षक कैलास आकुले, सहायक पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलीस हवालदार रमेश पाटील, दीपक पाटील व अशोक कोरडे यांनी घटनास्थळी धाव घेतली़मयत युवकाच्या मानेवर, खांद्यावर, छातीवर तसेच पोटावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले होते़ या युवकाच्या अंगावरील कपड्यांमध्ये असलेल्या मोबाइलवरून पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविली असता तो वैभव परदेशीचा असल्याचे समोर आले़ यानंतर पोलिसांनी हा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला़ डॉ़ सैंदाने यांनी शवविच्छेदन करून व्हिसेरा राखून ठेवला आहे़ दरम्यान, हा खून रविवारी (दि़ ५) सायंकाळ ते रात्रीच्या सुमारास झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे़ मयत परदेशीवर २००६ मध्ये सरकारवाडा पोलीस ठाण्यात शरीराविरुद्धचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ मात्र, न्यायालयाने त्याची निर्दोष सुटका केली आहे़ दरम्यान, परदेशी हा त्र्यंबकेश्वरच्या तोरंगण घाटात कसा आला? त्याच्या सोबत आणखी कोण होते? कुणाशी वैर होते का? खून का केला असावा? रात्रीपासून बेपत्ता असूनही त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार का नोंदविली नाही, या कारणांचा त्र्यंबकेश्वर पोलीस शोध घेत आहेत़ या प्रकरणाचा अधिक तपास त्र्यंबकेश्वरचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख करीत आहेत़ (प्रतिनिधी)
नाशकातील युवकाचा खून
By admin | Updated: June 7, 2016 07:23 IST