नाशिक : तिडके कॉलनीतील दीड वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याप्रकरणी तक्रार घेण्यास सरकारवाडा पोलिसांनी टाळाटाळ केल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे़ ही घटना ताजी असतानाच भद्रकाली व पंचवटी परिसरातील दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण झाल्याची घटना घडली असून, यामुळे शहरात लहान मुलांना पळविणारी टोळी सक्रिय झाल्याची चर्चा शहरवासीयांमध्ये सुरू आहे़कथडा येथील १३ वर्षीय मुलगा गुरुवारी (दि़१०) रोजी सायंकाळी सहा ते साडेसहा वाजेच्या सुमारास नानावलीतील फेमस बेकरीजवळ कैलास खेळत होता़ त्यावेळी मारुती ओम्नी वाहनातून आलेल्या तिघा संशयितांनी त्यास कुरकुरे देण्याचे आमिष दाखवून वाहनातून पळवून नेले़ या घटनेस अकरा दिवसांचा कालावधी उलटून गेला असून, मानसिक स्वास्थ्य हरविलेल्या या मुलाच्या कुटुंबीयांनी अखेर रविवारी (दि़२०) भद्रकाली पोलीस ठाण्यात अपहरणाची फिर्याद दिली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़दुसरी अपहरणाची घटना दिंडोरी रोडवरील मायको दवाखान्याजवळ घडली आहे़ एका मुलीचे बुधवारी (दि़१६) सकाळी दहा वाजेच्या सुमारास अपहरण झाले़ या घटनेस सहा दिवस उलटूनही पंचवटी पोलीस या मुलीचा ठावठिकाणा शोधू शकले नाही़ या प्रकरणी तिच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)
अपहरण करणारी टोळी?
By admin | Updated: September 21, 2015 23:56 IST