सिडको : येथील खुटवडनगर माउली लॉन्स व आयटीआय पूल परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण वाढत असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या मागणीनुसार हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या भागात सुमारे साठहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने संपूर्ण परिसरातील नागरिकांची प्राथमिक तपासणी करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले.परिसरातील खुटवडनगर, वावरेनगर, विठ्ठलनगर, चाणक्यनगर, सिद्धटेकनगर, मोगलनगर, जाधव संकुलसह आयटीआय पूल परिसर या भागात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे महापालिकेची चिंता वाढली असून, सदरचा परिसर सोमवार पासून (दि.१३) पुढील १४ दिवस अत्यावश्यक सेवा वगळता बंद करण्यात आला आहे.दूध, भाजीपाला, मेडिकल व्यवस्था या कामाव्यतिरिक्त अन्य कामांसाठी बाहेर जाणाऱ्या व येणाºया नागरिकांना प्रतिबंध करण्यात आला असून, यानंतरही कोणी बाहेर जात असेल त्यांची तपासणी करण्यात येणार असल्याचे मनपाच्या वतीने सांगण्यात आले. या भागात सुमारे साठहून अधिक कोरोनाबाधित रु ग्ण आढळले असून, यातील ३५ रुग्णांना बरे करून घरी सोडण्यात आले आहेत. उर्वरित २५हून अधिक रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहे. यापुढील काळात या भागात रुग्णसंख्या वाढू नये यासाठी महापालिकेने खबरदारी म्हणून हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे.दरम्यान, स्थानिक प्रतिनिधी अलका आहिरे, सुवर्णा मटाले, दीपक दातीर, हर्षदा गायकर, माजी नगरसेवक तानाजी जायभावे, दीपक मटाले, संदीप गायकर यांसह महापालिकेचे विभागीय अधिकारी संदेश शिंदे व मनपा कर्मचाऱ्यांनी बैठक घेतली. या बैठकीत सदरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आले.------------------महापालिकेने खुटवडनगर ते आयटीआय पूल या भागातील प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्याने अत्यावश्यक सेवा वगळता कोणालाही बाहेर ये-जा करता येणार नसल्याने या भागात असलेल्या कंपनी कामगारांची मात्र यामुळे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचे दिसून येत आहे.
खुटवडनगर, आयटीआय पूल परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 02:18 IST