सिन्नर : येथील शेतकरी कुटुंबातील विक्रम दगडू दराडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदाच्या अंतिम यादीत स्थान मिळविले आहे. विक्रम दराडे यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण दातली, बारावीपर्यंतचे शिक्षण सिन्नर महाविद्यालयात झाले. नाशिक येथील केटीएचएम महाविद्यालयात बीएससी, तर पुणे येथील मॉर्डन महाविद्यालयात एसीएस केले. दराडे यांनी सहा महिने आय. टी. कंपनीत नोकरी केल्यानंतर २०१३ पासून पुण्यात स्पर्धा परिक्षेच्या तयारीस प्रारंभ केला. पूर्व परिक्षा सहज उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी गेल्यावर्षी राज्य सेवेची मुलाखत दिली होती. मात्र अंतिम यादीत निवड झाली नाही. त्यानंतर दराडे यांनी मंत्रालयात कक्ष अधिकारी पदावर निवड झाली होती. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जेमतेम असताना वडिलांचे निधन झाल्यानंतर विक्रम यांचे आई व चुलत्याने संगोपन करुन त्यांचे शिक्षण पूर्ण केले. शेती कोरडवाहू असल्याने उच्च शिक्षणासाठी थोडी शेती विकण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. शेतीसाठी मिळणारे पीककर्ज, आईचे दागिने यांच्या पैशातून शैक्षणिक खर्च भागवावा लागला होता. भाऊ किरण व संदीप हे दोघे नवी मुंबई पोलीस झाल्यानंतर त्यांनी दोन वर्षे शिक्षणासाठी व स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी लागणाऱ्या खर्चासाठी तरतूद केली. (वार्ताहर)
खोपडीतील विक्रम दराडे बनला मुख्याधिकारी
By admin | Updated: April 7, 2016 00:37 IST