दहिवड : दीड दोन महिन्यापासून दडी मारून बसलेल्या पावसाने गेल्या दोन दिवसांपासून देवळा तालुक्यातील पूर्व भागात जोरदार हजेरी लावल्यामुळे खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले असून, काही भागात मात्र वादळी वाऱ्यामुळे बाजरी, मका, कांदे आदि पिके भुईसपाट झाल्याने शेतकरीवर्ग आणखी संकटात सापडला आहे.जून-जुलै महिन्यात झालेल्या जेमतेम पावसावर शेतकऱ्यांनी खरिपातील पिकांच्या पेरण्या केल्या होत्या. त्यानंतर मात्र सर्वत्र पावसाने दडी मारल्याने पिके सुकू लागली होती. मका, भुईमूग, कांदे, बाजरी, तूर अशी पिके पाण्याअभावी हातची सोडून देण्याची वेळ बळीराजावर आली होती. परंतु अनंत चतुर्दशीपासून सुरू झालेल्या पावसाने देवळा तालुक्याच्या पूर्व भागात चांगली हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग समाधानी झाला आहे. बाजरीच्या कणसात दाणे भरले गेले आहेत मात्र काल सायंकाळपासून सुरु झालेल्या वादळी पावसाने बाजरीचे पीक भुईसपाट झाले असून शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेले बाजरी पिकाचा घास हिरावला जातो का काय, या चिंतेने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. (वार्ताहर)
दहिवड परिसरात खरिपाला जीवदान
By admin | Updated: September 18, 2016 23:59 IST