नाशिकरोड : पोलीस म्हटलं की कोणाला भीतीचा, तर कोणाला त्यांच्या दराऱ्याचा अंगावर शहरा येतो. मात्र शहर विभाग-२ पोलीस प्रशासनाने गोरगरीब, अनाथ मुले, वृद्धाश्रमातील वयोवृद्ध यांच्यासोबत सोमवारी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेत फराळ-खाऊचे वाटप करून दिवाळी साजरी केली. यावेळी ‘खाकी’तील माणुसकी बघून उपस्थिताना गहिवरून आले होते. शहर विभाग-२ चे पोलीस उपआयुक्त श्रीकांत धिवरे यांनी आपल्या विभागातील पोलीस ठाण्यांना आपापल्या भागातील गोरगरीब, अनाथ मुले, वृद्धाश्रमातील वयोवृद्ध, अंध-अपंग शाळा आदि ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्याचा आगळावेगळा उपक्रम घेण्याचे सांगितले होते. त्यानुसार देवळालीगाव रोकडोबावाडी येथील स्वामी नित्यानंद आश्रम ट्रस्ट येथे सोमवारी सकाळी पोलीस उपआयुक्त श्रीकांत धिवरे, सहायक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत, बाळासाहेब पवार, उपनिरीक्षक एस. एन. चन्ना, सुजित मुंढे, एन. जे. जाधव आदिंसह पोलीस कर्मचाऱ्यांनी गोरगरीब मुले-मुली यांच्याशी संवाद साधून चर्चा केली. त्यांचे शिक्षण, खेळण्याची सुविधा, अडीअडचणी समजून घेत त्यांना फराळ, खाऊ, चॉकलेट आदिंचे वाटप केले. ‘पोलीसदादा’ नाव ऐकाल किंवा दिसला तरी घाबरणारी लहान मुले पोलीस अधिकारी-कर्मचारी यांच्यासोबत काही काळ सर्वकाही विसरुन दिवाळी सण साजरा करण्यात रमली होती. यावेळी रघुनाथ अरिंगळे, शंकर जाधव, सुजित बुवा, जगन बुवा, संपत बुवा, हिरामण बुवा, रघुनाथ अरिंगळे, दिलीप गवळी, अशोक भालेराव, शिवाजी बागुल, सुनील खोले, चिंतामण झनकर आदि उपस्थित होते. नाशिकरोड पोलिसांनी सामनगाव येथील वृद्धाश्रमात वयोवृद्धासोबत दिवाळी साजरी करण्यात आली. वृद्धाश्रमाचे प्रमुख मोहनलाल चोपडा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहळदे, युवराज गायकवाड, पी. आर. ढोकणे आदिंनी वृद्धांशी संवाद साधून अडीअडचणी, समस्या समजून घेत फराळाचे वाटप केले. तसेच देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या वतीने भगूर रेणुका माता मंदिर परिसरात गोरगरिबांना फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थिताना गहिवरून आले होते. (प्रतिनिधी)
खाकीच्या माणुसकीने गहिवरली मुले
By admin | Updated: November 11, 2015 21:41 IST