लोकसभा : दोन दिवसांवर आला निकालनाशिक : येत्या शुक्रवारी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. या निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांना गेल्या दोन-चार महिन्यांच्या धामधुमीचा थकवा घालविण्यासाठी दोन आठवड्यांपासून विश्रांती घेतल्यानंतर निकाल अवघ्या काही तासांवर आल्याने त्यांच्या डोक्यातील ठकठक वाढू लागली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत हे उमेदवार पुन्हा कार्यकर्त्यांमध्ये सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी गेल्या २४ एप्रिल रोजी मतदान झाले. त्यापूर्वी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात प्रत्यक्ष निवडणूक कामकाजाला सुरुवात झाली असली, तरी उमेदवारांनी त्यापूर्वी दोन-चार महिने अगोदरपासूनच मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचाराला प्रारंभ केला होता. प्रत्यक्ष निवडणुकीला प्रारंभ झाल्यानंतर उमेदवारांना तळपत्या उन्हात चांगलीच दगदग सोसावी लागली होती. अखेरच्या क्षणापर्यंत रंगतदार झालेल्या या निवडणुकीमुळे आजही अंदाज बांधणे कठीण झालेले असताना, मातब्बरांनाही शाश्वती नाही. त्यामुळे निवडणूक आटोपताच काहींनी दीर्घ विश्रांती घेणे पसंत केले, तर काहींनी थेट थंड हवेच्या ठिकाणची सहल करून थकवा घालविला. अनेकांनी निवडणुकीच्या काळातील रोजचा संपर्क कमी करून मोजक्याच काही कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवला होता. त्यातही सार्वजनिक ठिकाणी जाणे अनेकांनी टाळल्याचे दिसून आले. यातही गेलेच तर तिथेही निवडणुकीच्याच गप्पा रंगतात आणि त्यातून नको असलेले टेन्शन येतेच. त्यामुळे अनेकांनी सार्वजनिक ठिकाणी येणे बंद करून विश्रांती घेणेच पसंत केले होते. दरम्यान, राजकारणात मुरलेल्या उमेदवारांनीही गेल्या दोन आठवड्याच्या काळात स्वत:ला वेगळ्याच कामात गंुतवून घेतल्याचे दिसून आले. त्यावरून हार-जीत निवडणुकीचा एक अविभाज्य भाग असला, तरी त्याचे टेन्शन त्यांच्यावरही दिसून आलेच, हे अनेक बाबींवरून दिसलेच. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराच्या डोक्यात निवडणूक निकालाची ठकठक सुरू झाली असून, निकालापर्यंत ते ठोके वाढतच जाणार आहेत...
ठकठक वाढे डोक्यात...
By admin | Updated: May 14, 2014 01:12 IST