पेठ : आजूबाजूला पाण्याचा स्रोत नसल्याने विद्यालयाच्या आवारात बोअरवेल खोदण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे बोअरवेलला पाणीही भरपूर लागल्याने बालिकांच्या व शिक्षकांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते.पेठ येथील कस्तुरबा गांधी निवासी बालिका विद्यालयात १०० मुलींचा पाणीप्रश्न कायमचा निकाली निघाला असून मुबलक पाणी मिळणार असल्याने आता या मुली ज्ञानदानाचे धडे गिरविण्यास अधिक वेळ देऊ शकतील, असा विश्वास प्राचार्य श्रीमती पवार यांनी व्यक्त केला. सर्वशिक्षा अभियानचे जिल्हा समन्वयक दराडे, विषय सहायक वाल्मीक चव्हाण यांच्या माध्यमातून भगवान काळे यांनी स्वखर्चाने पाण्याची व्यवस्था करून दिल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.घरच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे शालेय शिक्षणापासून वंचित राहिलेल्या शाळाबाह्य मुलींना अडचणींवर मात करून पुन्हा शिक्षणाच्या मुळ प्रवाहात आणण्यासाठी शासनाने या मुलींसाठी पेठला कस्तुरबा गांधी निवासी बालिका विद्यालय सुरू करून १०० मुलींची शिक्षणाची सोय केली खरी. मात्र रणरणते ऊन, भीषण पाणीटंचाई यामुळे या मुलींची पाण्यासाठीची वणवण काही संपत नव्हती.अखेरीस नाशिकच्या भगवान काळे यांनी सामाजिक दायित्व जपत या कस्तुरबाच्या लेकींचा पाणीप्रश्न सोडविण्याचा निर्णय घेतला. पेठ सारख्या आदिवासी व अतिदुर्गम तालुक्यात १०० शाळाबाहय मुली शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येत आहेत हीच मोठी समाधानाची बाब आहे. या मुलींना शिक्षणात कोणत्याही प्रकारचे अडथळे येऊ नयेत तसेच दुष्काळी परिस्थितीवर मात करून त्यांना चांगले शिक्षण मिळावे या उद्देशाने पाणीप्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला आणी सुदैवाने त्याला यश ही आले.-भगवान काळे, नाशिक