नाशिक : महापालिकेचे नूतन आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी शुक्रवारी दुपारी मावळते आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडून कार्यभार स्वीकारला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अभिषेक कृष्णा यांनी रखडलेल्या बांधकाम परवानग्या आणि बहुचर्चित ‘कपाट’प्रकरणी तोडगा काढण्याचे संकेत देत महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी नवनवीन स्त्रोत निर्माण करण्याची ग्वाही दिली. पुणे महापालिकेच्या धर्तीवर प्रीमिअम आकारून बांधकामे नियमित करण्याचे सूतोवाच नूतन आयुक्तांनी केल्याने गेल्या दीड-दोन वर्षांपासून रखडलेला ‘कपाट’चा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची मुंबईला विक्रीकर सहआयुक्तपदी बदली होऊन त्यांच्या जागेवर पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांची आयुक्तपदी नियुक्ती झाली. शुक्रवारी आयुक्तांच्या निवासस्थानी कृष्णा यांनी गेडाम यांच्याकडून सूत्रे स्वीकारली त्यानंतर दुपारी त्यांनी महापालिकेत येऊन कार्यभार स्वीकारला. अभिषेक कृष्णा यांचे अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण आणि उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांनी प्रशासनाच्या वतीने तसेच महापौर अशोक मुर्तडक व उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी अभिषेक कृष्णा यांनी खातेप्रमुखांची बैठक घेऊन परिचय करून घेतला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत कृष्णा यांनी मूलभूत समस्या सोडविण्यावर आपला भर राहणार असल्याचे स्पष्ट केले. कृष्णा यांनी सांगितले, पाणीपुरवठा, सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन या समस्या सोडविण्याकडे लक्ष केंद्रित केले जाईल. राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशामुळे काही अटी-शर्तींवर बांधकाम परवानग्या दिल्या जात असल्याचे समजले आहे. परंतु, अटी-शर्तींवर परवानगी देत राहणे हा काही कायमस्वरूपी उपाय होऊ शकत नाही.
‘कपाट’ प्रकरण मार्गी लागणार
By admin | Updated: July 9, 2016 00:49 IST