नाशिक शहरात पावसामुळे खड्ड्यांची चाळण झाली आहे. शहरातील अनेक भागात अशी स्थिती आहे. नागरिकांना घरगुती आणि वाहन चालकांना इंधन पुरविण्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड(एमजीएनएल)कंपनीने शहर खोदून ठेवले होते. महापालिकेने पावसाळ्यापूर्वी काम थांबविण्याचे आदेश देऊनही हे काम अनेक भागात सुरू होते. त्यानंतर हे खोदलेले रस्ते तात्पुरत्या स्वरूपात बुजविण्यात आले असले तरी त्यातील मुरुम माती परत निघालेली आहे. नाशिक आणि पंचवटी गावठाणात तर स्मार्ट सिटी कंपनीने चांगल्या रस्त्यांची वाट लावली आहे. त्यामुळे या भागातील नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्मार्ट सिटी कंपनीने खेादलेल्या कामाविषयी तक्रार करून हे रस्ते आगामी काळातील दसरा,दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दुरुस्त करण्याची मागणी केली हेाती त्यानंतर आता भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांना नुकतेच पत्र दिले असून, त्यात शहरातील खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी केली आहे. इतकेच नव्हे तर महापालिकेने खड्डे बुजविण्याचे काम ज्या ठेकेदाराला दिले आहे, त्याने मुरुम टाकून खड्डे बुजविल्यानंतरदेखील दोन दिवसात मुरुम बाहेर पडतो. त्यामुळे हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. त्यामुळे हीच संधी साधून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केवळ निवेदन देऊन चालणार नाही, तर नाशिककरांची लूट रोखण्यासाठी राष्ट्रवादीबरोबर रस्त्यावर उतरून आंदोलन करा, असे आव्हान त्यांना दिले आहे. आता त्यावर फरांदे काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागून आहे.
..इन्फो...
साडेतीनशे कोटी रुपयांचे रस्ते केले तरी कुठे? नाशिक महापालिकेने गेल्या वर्षभरात साडेतीनशे कोटी रुपये केवळ रस्त्यांवर खर्च केला आहे. इतका मोठा खर्च होऊनदेखील रस्त्यांची चाळण होत असेल तर हे साडेतीनशे कोटी रुपये नक्की गेले कुठे, असा प्रश्न केला जात आहे.