घोटी : कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संपतराव काळे यांना सोमवारी (दि. २१) पिंपळगाव मोर सहकारी सोसायटीचे संचालक नसल्याच्या कारणावरून सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधकांनी घोटी त्यांचे बाजार समितीचे संचालकपद रद्द केल्याचा आदेश दिला.इगतपुरी तालुक्यात घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीची दीड वर्षापूर्वी पंचवार्षिक निवडणूक झाली होती. यात संपतराव संतू काळे हे सत्ताधारी गटाकडून निवडून आले होते. मात्र गेल्या काही महिन्यापासून संचालक मंडळात मतभेद निर्माण झाल्याने संपतराव काळे यांनी आपला स्वतंत्र गट निर्माण केला. दरम्यान, या राजकीय मतभेदामुळे दोन्ही गटामध्ये हेवेदावे सुरू झाले. यात पिंपळगाव मोर येथील सोसायटीचे चेअरमन राजाराम काळे यांनी संपतराव काळे हे सद्यस्थितीत पिंपळगाव मोर सोसायटीचे संचालक नसल्याने त्यांचे बाजार समितीचे संचालक पद रद्द करावे, अशी मागणी सहकार विभागाकडे केली होती. सहकार विभागाने पिंपळगाव मोर सोसायटी, घोटी बाजार समिती यांच्याकडून याबाबतचा खुलासा मागून खातरजमा केली. या निर्णयामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली असून, अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. (वार्ताहर) या निर्णयामुळे आगामी काळात बाजार समतिी व सहकाराच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात उलथा पालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, दरम्यान संपतराव काळे हे घोटी बाजार समिती जिल्हा उपनिबंधकांच्या निर्णयाविरोधात काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
काळे यांचे संचालक पद रद्द
By admin | Updated: March 21, 2016 23:05 IST